अमेझॉन प्राईमची फ्री ट्रायल अॅक्टिव्हेट करून देतो सांगत वृद्धाची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: September 13, 2023 07:29 PM2023-09-13T19:29:47+5:302023-09-13T19:29:55+5:30
अज्ञात व्यक्तीने एक लिंक पाठवून अप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी सांगितले.
पुणे : अमेझॉन प्राईमची फ्री ट्रायल अॅक्टिव्हेट करून देतो असे सांगून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ७१ वर्षीय व्यक्तीने तक्रार नोंदवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २६ जुलै २०२३ रोजी घडला आहे. याबाबत दिलीप छतानी (रा. कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार, तक्रारदार यांनी अमेझॉन प्राईमची मेम्बर्शीप मिळवण्यासाठी गुगलवर सर्च केले. त्यामध्ये दिलेल्या कस्टमर केयरच्या नंबर वर फोन केला. अज्ञात व्यक्तीने कस्टमर केयरमधून बोलत असल्याचे भासवून अमेझॉन प्राईमची फ्री ट्रायल ऍक्टिव्हेट करून देतो असे सांगितले. तक्रारदार यांचा विश्वास पटल्याने त्यांनी तत्काळ सहमती दर्शवली.
अज्ञात व्यक्तीने एक लिंक पाठवून अप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी सांगितले. अप्लिकेशन इन्स्टॉल केल्यावर तक्रारदार यांच्या मोबाईलचा रिमोट ऍक्सेस मिळवून त्यांच्या बँकेच्या खात्यातून ३ लाख ६६ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढंदील तपास महिला पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके या करत आहेत.