पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 11:35 AM2022-06-29T11:35:14+5:302022-06-29T11:37:06+5:30
महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष...
पुणे :पुणे महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने दोन महिलांसह चौघांची साडेसतरा लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी संतोष शांतीलाल वाल्हेकर (रा. ताडीवाला रस्ता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाघोली येथील ३६ वर्षांच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी वाल्हेकर याच्याशी पोटे यांची ओळख झाली होती. वाल्हेकरने त्यांना त्यांची भावजय तसेच परिचित दोघा तरुणांना पुणे महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. वाल्हेकर याने त्यांच्याकडून साडेसतरा लाख रुपये घेतले होते.
पैसे घेतल्यानंतर वाल्हेकरकडे त्यांनी नोकरीबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोटे यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गुरव तपास करत आहेत.
महापालिकेच्या शिपायाने तिघांना पालिकेतील नोकरीच्या आमिषाने साडे सोळा लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर आता येरवड्यात देखील असाच प्रकार समोर आला आहे.