नफा देण्याचे आमिष दाखवत दोघांची सव्वाचार लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: May 5, 2023 05:38 PM2023-05-05T17:38:09+5:302023-05-05T17:38:22+5:30
हडपसर आणि कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे: सोशल मीडिया अप्लिकेशन डाउनलोड करून वेगवेगळे टास्क पूर्ण केले तर बक्षीस स्वरूपात जादा रक्कम मिळेल असे आमिष दाखवून दोघांची १४ लाख २५ हजार २३१ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर आणि कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत राजेंद्र कोळी (२९, रा.हडपसर) यांनी हडपसर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना टेलिग्राम मधील एका ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले. त्यांनतर त्यांचा विश्वास संपादन करून वेगवेगळे टास्क केले तर बक्षीस म्हणून जादा रक्कम मिळेल असे देखील सांगण्यात आले. त्यासाठी काही पैसे भरायला लागतील असे सांगत वेळोवेळी त्यांच्याकडून ३ लाख २३१ रुपये भरून घेतले. मात्र याचा मोबदला मिळत नसल्याने कोळींना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनतर त्यांनी तात्काळ हडपसर पोलीस ठाण्यात यासंदर्भांत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक डगळे करत आहेत.
दुसऱ्या घटनेत राधिका नारायण कोलते (३०, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, टेलिग्रामवर रेखा नामक महिलेने सोशल मीडियावरून नारायण यांची माहिती घेऊन त्यांना संपर्क साधला. टेलिग्राम ग्रुपवर दिलेले वेगवेगळे टास्क केले तर जादा पैसे देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून वेळोवेळी ११ लाख २५ हजार रुपये उकळले. यानंतर कोणतेही जादा पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक उसगावकर हे पुढील तपास करत आहेत.