बनावट दस्तावेजाद्वारे सदनिकांचा करारनामा करून १ कोटी १८ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:10 AM2021-07-27T04:10:25+5:302021-07-27T04:10:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बनावट दस्तावेज तयार करून खरे असल्याचे भासवित सदनिकांचा करारनामा करून एकूण अकरा जणांची १ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बनावट दस्तावेज तयार करून खरे असल्याचे भासवित सदनिकांचा करारनामा करून एकूण अकरा जणांची १ कोटी १८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. त्याला ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी सोमवारी हा आदेश दिला.
महेश रामचंद्र तिखे (रा. कोथरूड) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एकूण ३३ जणांविरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१३ ते २०१८ या कालावधीत कोंढवे धावडे येथे घडला.
फिर्यादी यांनी आरोपी तिखेच्या कोंढवे धावडे परिसरातील प्रकल्पाच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर सदनिका आरक्षित केली होती. त्यासाठी त्यांनी आरोपीला एकूण सव्वासहा लाख रुपये दिले. या सदनिकेचा नोंदणी करारही केला. मात्र, तिखे याने जागा मालकासोबतचा करारनामा रद्द केला असतानाही खोटा दस्त तयार करून फिर्यादीसोबत करारनामा केला. आरोपीने नियोजित इमारतीमध्ये सदनिकेव्यतिरिक्त सामाईक पार्किंग, सामाईक स्वच्छतागृह, नळ जोडणी आदी सुविधा देण्याचेही मान्य केले होते. मात्र, यापैकी कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. आरोपींनी संगनमताने खोटे दस्तावेज तयार करून ते खरे आहेत, असे भासवून फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
आरोपी तिखेला कोर्टात हजर करण्यात आले. तिखे व अन्य आरोपींनी अशा प्रकारे आणखी दहा जणांची एकूण १ कोटी १८ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले. आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.