शतावरी लागवडीच्या आमिषाने २३ कोटी ४५ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:13 AM2021-09-17T04:13:49+5:302021-09-17T04:13:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शतावरी आणि अश्वगंधा य औषधी वनस्पतींची लागवड करून येणारे पीक एकरी ३ लाख रुपये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शतावरी आणि अश्वगंधा य औषधी वनस्पतींची लागवड करून येणारे पीक एकरी ३ लाख रुपये मोबदला देऊन विकत घेण्याचे आश्वासन देत, तसेच गुंतवणूकदारांना आयुष मंत्रालयाचा संदर्भ देऊन गुंतवणुकीस भाग पाडून २३ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेतील आर्थिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे.
ऋषिकेश लक्ष्मण पाटणकर (वय ३८, रा. आकाशदीप सोसायटी, धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल शहा (वय ४६, रा. जयराज किरण सोसायटी, वाळवेकरनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटणकरने तीन वर्षांपूर्वी शून्य हर्बल ॲॅग्रो डेव्हलपमेट प्रा. लि. या कंपनीची स्थापना केली. त्याने असंख्य शेतकरी आणि गुंतवणूकदारांना शतावरी आणि अश्वगंधा या औषधी वनस्पतीची त्यांच्या शेतात लागवड करण्यास सांगितले. येणारे पीक स्वत: विकत घेऊन त्यांना दर वर्षी एकरी ३ लाख रुपयांचा मोबदला देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी एकरी ५० हजार रुपये कंपनीकडे जमा करायचे, कंपनी शेतकऱ्यांना रोपे देणार, त्यांची लागवड ते स्वत: करणार, देखरेख करणार, खते देणार, एक वर्षांनी कंपनी स्वत: काढणी व वाहतूक करुन शेतकऱ्यांना जागेवर पैसे देणार अशी भरघोस आश्वासने दिली.
त्यानुसार सोलापूरसह अनेक जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कंपनीकडून रोपे घेऊन लागवड केली. त्यानंतर १८ महिन्यांनी त्यांनी मालही काढून नेला. परंतु, शेतकऱ्यांना पैसे मात्र दिले नाहीत. गेले दीड-दोन वर्षे शेतकरी पुण्यात अरण्येश्वर येथील कंपनीच्या कार्यालयात पैशांसाठी हेलपाटे मारत होते. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचीही शेतकऱ्यांनी भेट घेतली. तरीही काही उपयोग न झाल्याने शेवटी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना भेटून शेतकऱ्यांनी हकिगत सांगितली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास करुन ऋषिकेश पाटणकरला अटक केली आहे. त्याने अशा प्रकारे असंख्य शेतकरी आणि गुंतवणुकदारांची सुमारे २३ कोटी ४५ लाख १ हजार ९९४ रुपयांची फसवणूक केली.