वाहने भाडेतत्त्वावर लावण्याच्या आमिषाने अडीच कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:15 AM2021-08-15T04:15:05+5:302021-08-15T04:15:05+5:30

लोणी काळभोर : कंपनीत कामाला नसतानाही वाहने भाडेतत्त्वावर लावतो, असे आमिष दाखवत विश्वासात घेत ९ वाहनांचे करारपत्र बनवले. यासोबतच ...

Fraud of Rs 2.5 crore under the guise of renting vehicles | वाहने भाडेतत्त्वावर लावण्याच्या आमिषाने अडीच कोटींची फसवणूक

वाहने भाडेतत्त्वावर लावण्याच्या आमिषाने अडीच कोटींची फसवणूक

Next

लोणी काळभोर : कंपनीत कामाला नसतानाही वाहने भाडेतत्त्वावर लावतो, असे आमिष दाखवत विश्वासात घेत ९ वाहनांचे करारपत्र बनवले. यासोबतच इतर वाहनांचेही करारपत्रे बनवू, असे सांगत २ कोटी ४० लाख रुपये किमतीची २८ वाहने भाड्याने घेत त्यांचा अपहार केला. तसेच, वाहनांचे थकीत १५ लाख रुपयांचे भाडे न देता २ कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना लोणीकाळभोर येथे घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश बालाजी कदम (वय २८, रा. ढोरे फेज ४) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार मलिक बाबा शहा उर्फ मुजाहिद रफिउद्दिन सय्यद गिलानी (वय ३५), ओंकार ज्ञानदेव वटाने (वय २५, पत्ता माहीत नाही) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदम यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांची मार्च महिन्यात मलिक बाबा यांच्याशी ओळख झाली. युनायटेड एस एफ सी सर्व्हिस नावाची नेटवर्क टॉवरच्या कंपनीत काम करत असल्याचे मलिकने कदम यांना सांगितले. त्यांच्या कंपनीला गाड्यांची आवश्यकता असून गाडी कंपनीस लावण्यास प्रतिमहा २५ हजार मिळतील, असे कदम यांना सांगितले. कदम हे त्यांच्याकडील गाडी कंपनीत लावण्यास तयार झाले. आणखी गाड्या असल्यास कंपनीचे कंत्राट देतो असे मलिक याने कदम यांना आमिष दाखवले. कदम यांनी २८ वाहने त्यांच्या ओळखीतील लोकांकडून घेऊन मलिक याच्या ताब्यात दिली.

९ वाहनांचे करारपत्र मलिक बाबा याने तो काम करत असलेली कंपनी व कदम यांच्या सोबत बनवून त्याने ते करारपत्र कंपनीच्या मेल आयडीवरून कदम यांना पाठवले. दोन महिन्यांनंतर वाहनांचे भाडे देण्यात येईल असे करारपत्रामध्ये नमूद केले. त्याप्रमाणे दोन महिन्यांनंतर त्याने कदम यांना टप्याटप्प्याने एकूण ५ लाख ५० रुपये रोख स्वरूपात, तर काही रक्कम वटाने याच्या बँक खात्यामधून ट्रान्सफर केले. कदम यांनी उर्वरित रक्कम मागितली असता त्याने कंपनीच्या सीईओ सोबत बैठक झाल्यानंतर थकीत रक्कम देतो असे सांगितले. २७ जुलैला दिल्ली येथील कंपनीच्या कार्यालयास कदम यांना बैठकीसाठी बोलावले. त्याप्रमाणे अविनाश कदम हे भाऊ धनाजी कदम यांच्याबरोबर मलिक याने दिलेल्या दिल्लीतील पत्त्यावर गेले. मात्र, त्यांना असे कुठलेच कार्यालय सापडले नाही. त्यांनी स्थानिक लोकांकडे चाैकशी केली असता अशी कुठलीच कंपनी नसल्याचे कळाले. त्यांनी मलिक यास फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन बंद लागला. यामुळे फसवणूक झाल्याची खात्री कदम यांना झाली. यानंतर त्यांनी या प्रकरणी तक्रार दिली.

Web Title: Fraud of Rs 2.5 crore under the guise of renting vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.