क्रेडिट कार्डची माहिती हॅक करून बँकेसह ग्राहकांच्या तब्बल २९ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 11:18 AM2021-04-08T11:18:20+5:302021-04-08T11:19:01+5:30
विमान तिकिटांच्या खरेदीसाठी केला पैशांचा वापर
पिंपरी: क्रेडिट कार्डची माहिती हॅक करून २९ लाख ७४ हजार ८३३ रुपयांची विमानाची तिकिटे खरेदी केली. यात आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकाची व बँकेची फसवणूक झाली आहे. हिंजवडी येथे २४ डिसेंबर २०२० ला ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार घडला.
आयसीआयसीआय बँकेचे हिंजवडी येथील डेप्युटी मॅनेजर मिलिकअर्जून परमेश्वर नंदर्गी (वय ४०) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदर्गी यांच्या आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक अनिल शिवाजी घाडगे (रा. वाकड) यांच्या क्रेडिट कार्डची माहिती अज्ञात आरोपींनी संगणक यंत्रणेचा वापर करून हॅक केली. तसेच घाडगे यांच्या क्रेडिट कार्डवरून २९ लाख ७४ हजार ८३३ रुपयांचा वापर विमानाचे तिकीट खरेदी करण्यासाठी करून बँक व ग्राहकाची फसवणूक केली. हिंजवडीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड पुढील तपास करत आहेत.