जमिनीच्या व्यवहारात ६ कोटी ४० लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:53+5:302021-06-01T04:08:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फ्लॅट देण्यास व फ्लॅटचे पैसे देण्यास असमर्थ ठरल्यानंतर, न्यायालयाने जमीन नावावर करून देण्यास सांगितले, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फ्लॅट देण्यास व फ्लॅटचे पैसे देण्यास असमर्थ ठरल्यानंतर, न्यायालयाने जमीन नावावर करून देण्यास सांगितले, असे असताना ती जमीन जॉइंट व्हेंचरखाली दुसऱ्याला देऊन त्या ठिकाणी बांधकाम सुरू करून ६ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संजय ओव्हाळ आणि अशोक ओव्हाळ (रा. प्रभात रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मुकेश आनंद शुक्ला (वय ६६, रा. आनंद विलास, धंतोली, नागपूर) यांनी फिर्याद दिली आहे.
मुकेश शुक्ला, शशांक मनोहर, दिलीप भांबुरकर यांच्याकडून आरोपींनी २ कोटी ८१ लाख रुपये घेऊन फ्लॅट देणार होते. पण त्यांनी फ्लॅट दिला नाही. त्यांचे पैसे परत करता येत नसल्याने न्यायालयाने धायरी येथील ४३ गुंठे जागा तक्रारदारांच्या नावावर करून देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी एप्रिल २०२१ मध्ये जमिनीचे खरेदीखत करून दिले. त्यांना जमिनीचा ताबा दिला. मात्र, त्याअगोदर आरोपींनी फेब्रुवारी महिन्यात ती जमीन सागर
भालेराव यांना जॉइंट व्हेंचर करार करून दिल्याचा प्रकार उघडकीस आला.
फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्या जमिनीवर बांधकाम सुरू करून सुमारे ६ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.