फेसबुकवर मैत्री करुन तरुणीला 9 लाख 17 हजारांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 06:29 PM2019-06-09T18:29:22+5:302019-06-09T18:31:37+5:30
पुण्यातील एका नामांकित रुग्णालयातील ट्रेनी डाॅक्टरला फेसबुकवरुन मैत्री करत प्रेमात गुंतवून भावनिक करत 9 लाख 17 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे.
पुणे : पुण्यातील एका नामांकित रुग्णालयातील ट्रेनी डाॅक्टरला फेसबुकवरुन मैत्री करत प्रेमात गुंतवून भावनिक करत 9 लाख 17 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने अलंकरा पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञात माेबाईलधारक महिला आणि वेगवेगळ्या बॅंकेचे खातेधारक यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 वर्षीय तरुणी पुण्यातील एका नामांकित रुग्णालयामध्ये ट्रेनी डाॅक्टर म्हणून काम करते. तिला 25 मार्च राेजी 2019 राेजी तिच्या जुन्या महाविद्यालयातील मैत्रिणी रुक्साना नबी हिने फेसबुकवरुन संपर्क करत हर्षा चेरुकुरी हा तरुण तुला कशासाठी फाॅलाे करत आहे असे विचारले. त्यावेळी तिने अशा व्यक्तीला ओळखत नसल्याचे तरुणीने सांगितले. त्यावेळी तिच्या मैत्रिणीने तिच्याकडे तिच्या माेबाईल क्रमांकाची मागणी केली. तरुणीने तिचा क्रमांका तिला. त्यानंतर 9 एप्रिल राेजी तरुणीला एका क्रमांकावर हर्षा चेरुकुरी या तरुणाचा व्हाॅट्स अप मेसेज आला. त्यात मी तुला फेसबुकवर फाॅलाे करताेय आणि तुला फ्रेंन्ड रिक्वेस्ट पाठविल्याचे ताे म्हणाला. तसेच त्याचे मित्र मैत्रिण तरुणीला ताे का फाॅलाे करत आहे असे विचारत आहेत, असे त्याने सांगितले. तरुणीने त्याला ओळखत नसल्याचे सांगत तिच्याशी संपर्क न ठेवण्याचे सांगितले. त्यानंतर 16 मे राेजी फेसबुकवर स्वातिका जेस्सी या नावाच्या अकाऊंटवरुन तरुणीला मेसेज आला की तु हर्षा चेरुकुरी ला कशी काय ओळखतेस. त्याचे खूप फाॅलाेअर्स असून ताे एक चांगला माणूस आहे. त्याने एका अपंग मुलील आर्थिक मदत केली आहे. हर्ष चेरुकुरी चे सामाजिक काम आवडल्याने तरुणीने त्याचा माेबाईल क्रमांक त्या मुलीला मागितला.
त्यानंतर 18 मे 2019 राेजी पुन्हा हर्षा चेरुकुरी नावाच्या व्यक्तीचा एका वेगळ्या क्रमांकावर तरुणीला मेसेज आला. त्याने त्याचे आई वडील हे डाॅक्टर असून ते अमेरिकेला असल्याचे सांगितले. तसेच त्याने एका मुलीला दत्तक घेतल्याचे सांगितले. तरुणीने दत्तक घेतलेल्या मुलीला फाेटाे पाठविण्यास सांगितले तर त्याने फाेटाे न पाठवता त्याच्यावर विश्वास ठेवण्यास सांगितले. तसेच यासाठी त्याने त्याच्या आईची खाेटी शपथ देखील घेतली. अशाप्रकारे तरुणीशी ओळख वाढवून तिच्यावर प्रेम करत असल्याचे हर्ष चेरुकुरी या व्यक्तीने सांगितले. त्यावर तरुणीने देखील त्याला हाेकार दिला. त्यानंतर ते अनेकदा फाेनवर बाेलत असे तसेच चॅटींग करत असत. या बाेलण्यातून ताे खूप चांगला माणूस असून आपल्याशी लग्न करणार असल्याची तरुणीला खात्री पटली. तसेच तिने काही दिवस तिचे फेसबुक अकाऊंट हर्षा चेरुकुरीला वापरायला देखील दिले हाेते.
त्यानंतर हर्षा चेरुकुरीने वेळाेवळी तिच्याशी संपर्क करुन सामाजिक कामसाठी पैसे लागत असल्याचे भासवत विविध संस्था तसेच खात्यांवर पैसे पाठविण्यास तरुणीला सांगितले. अशाप्रकारे 22 मे 2019 ते 6 जून 2019 या कालावधीत तरुणीकडून 9 लाख 17 हजार रुपये उकळले. तरुणीने अनेकदा तिच्याजवळ पैसे नसल्याने तिचा भाऊ व मित्र मैत्रिणींकडून पैसे घेऊन हर्षा चेरुकुरीने सांगितलेल्या खात्यांवर भरले हाेते. 6 जून 2019 राेजी तरुणीने तिचे फेसबुक अकाऊंट चेक केले असता काही लाेक ब्लाॅक केले असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यातील एका अकाऊंटवरील व्यक्तीचा चेहरा हर्षा चेरुकुरीच्या चेहऱ्या साराख हाेता. त्यावेळी तरुणीने त्याचे अकाऊंट पाहिले असता त्यावर 5 जून 2019 राेजी हर्षा चेरुकुरी नावने एक फेक अकाऊंट असून त्याद्वारे तरुणींना फसविले जात असल्याचे त्यावर लिहीले हाेते. तसेच त्या फेक अकाऊंट तयार करणाऱ्या व्यक्तीचे नाव वामसी मनाेहर जाेगाडा असे असल्याचे तसेच त्याला टु टाऊन पाेलीस स्टेशन, काकीनाडा पाेलिसांनी अटक केल्याचे लिहीले हाेते. यावरुन तरणीची आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
याप्रकरणी अलंकार पाेलीस स्टेशनच्या वरिष्ठ पाेलीस निरीक्षक कल्पना जाधव अधिक तपास करीत आहेत.