सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमवा आणि शिका याेजनेत घाेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 09:34 PM2019-05-05T21:34:06+5:302019-05-05T21:35:23+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका’ या योजनेमध्ये आर्थिक घोळ झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका’ या योजनेमध्ये आर्थिक घोळ झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. योजनेचा आर्थिक फायदा बोगस विद्यार्थ्यांना होत असल्याची साशंकता व्यक्त केली जात आहे. योजनेत प्रत्यक्ष काम करणाऱ्या विद्यार्थ्यांऐवजी अन्य विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात मानधन जमा होत असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. दरम्यान, या घोळाची व्याप्ती शोधण्यासाठी विद्यापीठाने उच्चस्तरीय समिती नेमली आहे.
विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका ही योजना अनेक वर्षांपासून राबविली जात आहे. विद्यापीठाच्या आवारातील विविध विभागांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ असते. या योजनेंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति तास ४५ रुपये याप्रमाणे मानधन दिले जाते. दररोज तीन तास काम करण्याची मुभा आहे. अनेक गरजु विद्यार्थ्यांना त्यांचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी याची मदत होते. महिनाभरात संबंधित विद्यार्थ्याने किती तास काम केले, त्याआधारे एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. पण या प्रक्रियेमध्ये मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे.
या योजनेचा नियमित आढावा घेताना या प्रकाराचा उलगडा झाला आहे. विद्यार्थ्यांना मानधन वितरित करताना काही अनियमितता दिसून आली असून ही बाब गंभीर असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थी कल्याण मंडळाच्या कार्यालयातील काही कागदपत्रे प्रशासनाने ताब्यात घेतल्याचे समजते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली असून ही समिती सर्व कागदपत्रांची तपासणी करणार आहे.
विद्यापीठाची चौकशी समिती
विद्यापीठाच्या अंतर्गत प्रक्रियेचा भाग म्हणून सर्वच योजनांचा नियमित आढावा घेतला जातो. त्यानुसार ‘कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजने’चा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मानधन वितरित करतांना काही आर्थिक अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे. या सर्व प्रकरणाची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील ३ आठवड्यांत मिळेल.
- प्रभाकर देसाई, संचालक विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ