जादा कामगार दाखवून फसवणूक; सदाशिव पेठेतील घटना, अकौंटंटवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:28 PM2018-01-12T13:28:18+5:302018-01-12T13:30:44+5:30
कामगारांच्या संख्येपेक्षा तीन महिला जादा दाखवून त्यांच्या नावाने पगार काढून व्यावसायिकाची ९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या अकौंटंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
पुणे : लाँड्रीत काम करणाऱ्या कामगारांच्या संख्येपेक्षा तीन महिला जादा दाखवून त्यांच्या नावाने पगार काढून व्यावसायिकाची ९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या अकौंटंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
विष्णुवर्धन शशिकांत वाडी (वय ३२, रा़ आंबेगाव पठार) आणि तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी महेश घाटगे (वय ४५, रा़ सदाशिव पेठ) यांनी फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी सांगितले की, घाटगे यांची केळकररोडवर लाँड्री आहे़ त्यांच्याकडे विष्णुवर्धन वाडी हा अकौंटंट म्हणून गेल्या २ वर्षांपासून काम करीत आहे़ घाटगे यांनी कामगारांचे पगारपत्रक दिले की, वाडी या त्यामध्ये मालकाला न कळत २० हजार रुपयांची वाढ करायचा आणि हे पैसे तीन महिलांच्या बँक खात्यात जमा करीत असे़ डिसेंबर २०१६ पासून सप्टेंबर २०१७ पर्यंत हा प्रकार सुरू होता़ या महिलांच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर महिन्याभरानंतर या महिलांशी संगनमत करून तो पैसे काढून घेत असे़ सप्टेंबर २०१७ नंतर ही बाब घाटगे यांच्या लक्षात आली़ त्यांनी वाडी याच्याकडे त्याबाबत चौकशी केली़ पण, त्याने व्यवस्थित उत्तरे दिली नाही़ गेल्या दोन महिन्यांपासून तो कामाला आला नाही़ शेवटी त्यांनी पोलिसांकडे फसवणुकीची फिर्याद दिली आहे़ या तीन महिलांच्या बँक खात्याची तपासणी केल्यावर त्यांच्या खात्यात पैसे नसल्याचे आढळून आले आहे़ अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आऱ व्ही़ शेवते करीत आहेत़