बनावट कागदपत्रे करून 36 लाख रुपये कर्ज घेऊन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:11 AM2021-02-14T04:11:11+5:302021-02-14T04:11:11+5:30
काळभैरवनाथ पतसंस्थेच्या शाखा अधिकारी वैशाली संजय आरुडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ...
काळभैरवनाथ पतसंस्थेच्या शाखा अधिकारी वैशाली संजय आरुडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव येथील साई मल्हार डेव्हलपर्सतर्फे भागीदार राजेंद्र फकिरा पोटे, अशोक भगवंतराव घोलप, यशवंत भागाजी दिघे, सीताबाई विठ्ठल गांगरे यांनी जमीन विकसित करून त्यावर इमारत बांधकाम करून अनिल शामसुंदर बेल्हेकर व समर्थ अनिल बेल्हेकर यांना चौथ्या मजल्यावर सदनिका क्रमांक ए ४०२ व ए ४०५ या ४ ऑक्टोबर २०१७ रोजी दुय्यम निबंधक नारायणगाव येथे रजिस्टर करारनामा दस्त करून नोंदवून घेतला. सदर सदनिका काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था शाखा मंचर शाखेमध्ये तारण ठेवून त्यावर ४० लाख रुपये कर्ज मंजूर केले. त्यापैकी ३६ लाख रुपये कर्ज पतसंस्थेचे सहखजिनदार रुपेश भोर यांनी पाहणी केल्याने व काम पूर्ण झाले असल्याचे सांगितल्याने त्यांच्या सांगण्यावरून दिले. कर्जाचे हप्ते वेळेवर न आल्याने संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरहरी घुले, विशेष वसुली अधिकारी देवराम महाकाळ प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गेले असता संगनमत करून सदनिकेचे बांधकाम अपूर्ण असताना सदनिका बांधकाम पूर्ण झाल्याचे हमीपत्र, ताबा पावती व डिमांड लेटर ही खोटी कागदपत्रे सादर केल्याचे आढळले. पूर्ण रक्कम न भरल्याने मंचर पोलीस ठाण्यांमध्ये पतसंस्थेच्या वतीने तक्रार दिली आहे. अनिल शामसुंदर बेल्हेकर,समर्थ अनिल बेल्हेकर (दोघे रा. आनंदवाडी, नारायणगाव ता,जुन्नर) साई मल्हार डेव्हलपर्स तर्फे भागीदारी राजेंद्र फकिरा पोटे (रा. पिंपळगाव सिद्धनाथ ता,जुन्नर), अशोक भगवंतराव घोलप (रा. खामगाव, ता. जुन्नर), यशवंत भागाजी दिघे (रा. काठापूर खुर्द, ता. आंबेगाव),सीताबाई विठ्ठल गागरे (रा. नारायणगाव ता. जुन्नर) काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेचे सहखजिनदार रुपेश जयसिंग भोर (रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन शिंदे पुढील तपास करत आहेत.