Pune Crime: फायनान्स कंपनीच्या संगणक प्रणालीत छेडछाड करुन फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 12:54 PM2021-11-25T12:54:19+5:302021-11-25T12:55:36+5:30
अनुप रॉय याने ज्यांचा सीबील रेकॉर्ड चांगले आहे. अशाच्या पॅनकार्डवर स्वत:चा फोटाे व पत्ता लिहून बनावट पॅनकार्ड तयार केले...
पुणे : कर्ज मिळविण्यासाठी बनावट पॅनकार्ड तयार करुन त्याद्वारे वेगवेगळ्या वस्तू खरेदी करुन फायनान्स कंपनीच तब्बल ३ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अनुप रणजित रॉय (वय ३३, रा. खोपडेनगर, गुजरवाडी रोड, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत हेमंत अहिरराव (वय ४१, रा. आंबेगाव पठार) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप रॉय याने ज्यांचा सीबील रेकॉर्ड चांगले आहे. अशाच्या पॅनकार्डवर स्वत:चा फोटाे व पत्ता लिहून बनावट पॅनकार्ड तयार केले. त्या पॅनकार्डच्या आधारे त्याने नामांकीत फायनान्स कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरील इनस्टॉप या संगणकीय प्रणाली मधील इएमआय कार्डवर ऑनलाईन नोंद केली. याद्वारे त्याने कर्ज मिळवून वेगवेगळ्या दुकानातून मोबाईल, टीव्ही, वॉशिंग मशीन असा ९ वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्या. त्याद्वारे त्याने ३ लाख ४८ हजार रुपयांची फायनान्स कंपनीची फसवणूक केली.
हा प्रकार १ सप्टेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान घडला. फायनान्स कंपनीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी संबंधित दुकानदारांना याची माहिती दिली. त्यानुसार मेहता टेलिकॉमच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अनुप रॉय याला अटक केली. गुन्हे निरीक्षक कुंडलीक कायगुडे अधिक तपास करीत आहेत.