दागिने साफ करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:13 AM2021-09-18T04:13:17+5:302021-09-18T04:13:17+5:30
येलवाडी येथील घटना,. चाकण : आमच्याकडे भांडी साफ करण्याची पावडर असल्याचे सांगून दोघा भामट्यांनी एका महिलेच्या घरातील चांदीची मूर्ती ...
येलवाडी येथील घटना,.
चाकण : आमच्याकडे भांडी साफ करण्याची पावडर असल्याचे सांगून दोघा भामट्यांनी एका महिलेच्या घरातील चांदीची मूर्ती साफ करून दिली. महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून सोन्याचे दागिने साफ करण्यासाठी ताब्यात घेऊन दोघे जण पसार झाले. याबाबत महिलेने फसवणुकीची तक्रार दिली आहे. खेड तालुक्यातील येलवाडी येथे सदरची घटना २६ ऑगस्ट रोजी राजे शिवछत्रपती हौसिंग सोसायटीत घडली. याप्रकरणी महिलेने शुक्रवारी (१७ सप्टेंबर) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अनोळखी भामटे फिर्यादी महिलेच्या घरी आले. आम्ही भांडी साफ करण्याची पावडर विक्रीसाठी आलो आहोत. तुमची भांडी साफ करून देतो, तुमच्याकडे भांडी असतील तर ती द्या, असे म्हणून भामट्यांनी फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. महिलेच्या घरातील चांदीची गणपतीची मूर्तीदेखील भामट्यांनी साफ करून दिली. त्यानंतर त्यांनी आमच्याकडे सोन्याचे दागिने साफ करून देण्याची पावडर असल्याचे महिलेला सांगितले. महिलेने घरातील ६५ हजार रुपये किमतीचे १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडे साफ करण्यासाठी दिले. त्यांनी सोन्याचे दागिने घेऊन गुपचूप पोबारा केला.