'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या नावाचा गैरवापर करुन दीड कोटी रुपयांची फसवणूक; एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 07:56 PM2020-11-23T19:56:45+5:302020-11-23T19:58:12+5:30

जमिनीत गुंतवणुक करण्याचे दाखवत होता आमिष

Fraud by using the name of 'Art of Living'; One arrested | 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या नावाचा गैरवापर करुन दीड कोटी रुपयांची फसवणूक; एकाला अटक

'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या नावाचा गैरवापर करुन दीड कोटी रुपयांची फसवणूक; एकाला अटक

Next

पुणे : श्री श्री रविशंकर यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चा डिस्ट्रीक डेव्हलपमेंट कॉर्डिनेटर असल्याचे सांगत बोगस कंपनीद्वारे जमिनीत गुंतवणुक करायला लावून दीड कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट ४च्या पथकाने अटक केली आहे. प्रणय उदय खरे (वय २८, रा. साळुंखे विहार, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. 

याप्रकरणी अश्विनीकुमार कांबळे (वय ४४, रा. औंध) यांची फिर्याद दिली आहे. प्रणय खरे याने जे. के. व्हेंजर्स नावाची बोगस कंपनीची स्थापना केली. कंपनीमार्फत रत्नागिरी, खेड येथे ७ हजार एकर जागा घेतली आहे, असे खरे याने कांबळे यांना सांगून या जागेमध्ये १५ वर्षाकरीता १ एकर जागेसाठी गुंतवणुक केल्यास पहिल्या ११ गुंतवणूकदारांना १ कोटी रुपये, त्यानंतरच्या ५० गुंतवणूकदारांना ५० लाख रुपये , त्यानंतरच्या उर्वरीत गुंतवणुकदारांना ४० लाख रुपये, ६ वर्षानंतर टप्प्या टप्प्याने दिले जातील. तसेच शॉर्ट टर्म प्लॅन व मोरींगा झाडे लावण्याच्या प्लॅनमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर नफा मिळेल, असे भासवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना १ कोटी ४५ लाख १६ हजार १११ रुपये त्यांच्या कंपनीच्या स्कीममध्ये गुंतविण्यास भाग पाडले. जानेवारी २०१७ मध्ये फिर्यादी यांनी त्यात गुंतवणुक केली. त्यानंतर आजपर्यंत कोणताही परतावा न देता फिर्यादी यांनी दिलेली रक्कम स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता वापरुन फसवणूक केली. 

खरे याने विस्तार ३६०, दि योगीक, ए. एच. ओ लाईफ स्टाईल प्रा. लि., प्रणल्स मेडिया प्रा. लि. नावाने कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यामार्फत त्याने वेगवेगळ्या लोकांची स्कीमच्या माध्यमातून पुणे शहर व बाहेर बर्याच लोकांना फसविले असल्याचे तपासात निष्पन्न  झाले  आहे. ज्यांची फसवणूक  झाली आहे,  अशा लोकांनी  खडकी येथिल  युनिट ४ च्या कार्यालयाशी  संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.  पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल,  उपनिरीक्षक दीपक माने, गीता पाटील व त्याच्या पथकाने ही कामगिरी केली.

आर्ट ऑफ लिव्हीगचे मुख्यालय उदयपूर बंगलुरु येथे असून त्यांच्या देशभरात शाखा आहेत. ही संस्था लोकांना ध्यान धारणांचे प्रशिक्षण देण्याचे व ध्यान धारणेचे महत्व लोकांना पटवून देण्याचे महत्वाचे काम करते. त्यांच्या पुण्यातही शाखा आहेत. प्रणय उदय खरे याने आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेत प्रवेश मिळवून डी डी सी (डिस्ट्रीक डेव्हलपमेंट कॉर्डिनेटर ) या पदावर असल्याचा बनाव करुन आर्ट ऑफ लिव्हींग ची त्याच्या जे. के. व्हेंचर्स कंपनी माफर्त कार्यशाळा आयोजित करत होता. ही कंपनी 'आर्ट ऑफ लिव्हिंग' या संस्थेशी संबंधित असल्याचे सांगून लोकांचा विश्वास संपादन करत असे. त्यांना आपल्या जाळ्यात ओढून वेगवेगळ्या आर्थिक गुंतवणुकीच्या स्कीम सांगून त्यांच्याकडून मोठमोठ्या रक्कमा घेऊन त्याची फसवणूक करत होता. अनेक दिवस पोलीस त्याच्या मागावर होते.

.............

प्रणय खरेची २० बँक खाती...                                                                         
 आर्ट ऑफ लिव्हींगचा पदाधिकारी असल्याचे सांगणार्या प्रणय खरे याच्याकडे अनेक महत्वाची कागदपत्रे आढळून आली आहेत. त्यातून त्याची २० बँक खाती असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने प्रथम पुण्यातील आर्ट ऑफ लिव्हींगच्या केंद्रात प्रवेश घेतला. त्या ठिकाणी येणार्या नागरिकांना तो तेथील पदाधिकारी असल्याचे भासवत होता. त्याने आर्ट ऑफ लिव्हींगच्या काही कार्यशाळाही आयोजित केल्या होत्या. त्यातून लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला. आपण रत्नागिरी, खेड येथे जमीन खरेदी केली आहे. तेथे चंदनाची व शेवग्याची  झाडे लावून व्यवसाय करणार असल्याचे सांगत असे.  तो लोकांना आपण अध्यात्मिक असल्याचे भासवत असल्याने लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

Web Title: Fraud by using the name of 'Art of Living'; One arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.