कोकणात जमीन खरेदीच्या आमिषाने महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:30+5:302021-07-12T04:08:30+5:30
पुणे : कोकणात दापोली परिसरात जमीन खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून महिलेची ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर ...
पुणे : कोकणात दापोली परिसरात जमीन खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून महिलेची ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रवी गजाननराव शिंदे (वय ३९, रा. इशा गार्डन, महेश विद्यालयासमोर, कोथरूड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला औंध भागात राहायला आहेत. तीन वर्षांपूर्वी महिलेची शिंदे याच्याबरोबर ओळख झाली होती. कोकणातील दापोली परिसरात असलेल्या सागर साद स्कीम या प्रकल्पात २० गुंठे जमीन खरेदी करून देतो, असे आमिष शिंदेने त्यांना दाखविले होते. त्यानंतर त्याने महिलेकडून वेळोवेळी ७ लाख रुपये घेतले होते. समजुतीचा करारनामा आरोपीने त्यांच्याबरोबर केला होता. त्यानंतर खरेदीखत न करता महिलेची फसवणूक केली.
महिलेने त्याच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक वाय. बी. पडवळे तपास करत आहेत.