जागा खरेदीच्या नावाखाली महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:27+5:302021-07-11T04:09:27+5:30
बारामती : जागा खरेदीच्या नावाखाली दोन एजंटांनी महिलेची सुमारे १ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला ...
बारामती : जागा खरेदीच्या नावाखाली दोन एजंटांनी महिलेची सुमारे १ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शांता हिराचंद वलेकर (रा. कोथळे, ता. माळशिरस) या महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. सचिन हरीभाऊ नरुटे (रा. काझड, ता. इंदापूर) व अमित हरिश्चंद्र रूपनवर (रा. कुरबावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. १२ जुलै २०२० ते २१ ऑक्टोबर २०२० रोजी बारामतीत ही घटना घडली. फिर्यादीला बारामती शहरात घर बांधण्यासाठी जागा विकत घ्यायची होती. त्यातून त्यांची नरुटे व रूपनवर यांच्याशी ओळख झाली. हे दोघे जमीन, प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. या दोघांनी त्यांना तुम्हाला बारामतीत दोन गुंठे जागा घेऊन देतो, त्यासाठी १० लाख रुपये लागतील. त्यातील दोन लाख रुपये आधी द्यावे लागतील तर, उरलेली रक्कम खरेदी खतावेळी द्या, असे सांगितले. त्यावर फिर्यादीने त्यांच्यावर विश्वास ठेवला. तसेच बँक खात्यावर, रोखीत अशा पद्धतीने सुमारे दोन लाख तीन हजारांची रक्कम त्यांना दिली.
त्यानंतर फिर्यादीने जागेचा व्यवहार पूर्ण करा, अशी मागणी केली असता तुम्ही ८ लाख रुपये घेऊन या, जागा तुमच्या नावावर करून देतो, असे सांगितले. त्यांनी दोन महिने टाळाटाळ केली. फिर्यादीने पाठपुरावा सुरू ठेवला. त्यावर सचिन नरुटे याने ४० हजारांची रक्कम चेकने परत केली. उरलेल्या १ लाख ६३ हजार ५०० रुपयांची मागणी केली. या वेळी या दोघांनी तुला पैसे देणार नाही, काय करायचे ते कर असे म्हणत रक्कम देण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.