कौन बनेगा करोडपतीच्या नावाखाली २३ लाखांना गंडा; २५ लाखांची लॉटरी लागल्याचा केला बनाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 05:24 PM2020-11-10T17:24:47+5:302020-11-10T17:24:59+5:30
कौन बनेगा करोडपतीमध्ये आपला नंबर लागला असून त्यात तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे सांगितले..
पुणे : ‘कौन बनेगा करोडपती’ या वाहिनीवरील कार्यक्रमाचा गैरफायदा घेऊन सायबर चोरटे घेऊ लागले आहेत. २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचा बहाणा करुन चोरट्याने एका महिलेला तब्बल २३ लाख ४१ हजार २०५ रुपये ट्रान्सफर करायला भाग पाडले. याप्रकरणी हिंगणे खुर्द येथे राहणाऱ्या ३९ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिलेला २० ऑगस्ट रोजी एक मोबाईल कंपनीतून बोलत असल्याचे सांगणाऱ्या एकाचा फोन आला होता. त्याने कौन बनेगा करोडपतीमध्ये आपला नंबर लागला असून त्यात तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे सांगितले. हे बक्षीस देण्यासाठी तुम्हाला टॅक्स, इन्शुरन्स यासाठी पैसे भरावे लागतील, असे सांगितले. २५ लाख रुपये मिळणार म्हटल्यावर या महिलेने सर्व सारासार विचार करणे सोडून दिले़. सायबर चोरट्यांनी़ त्यांना व्हॉटसअॅपद्वारे प्रमाणपत्र, लॉटरी तिकीट इत्यादी माहिती पाठविली. त्यावर या महिलेने विश्वास ठेवून ते सांगितले. त्यानुसार त्या बँक खात्यात पैसे भरु लागल्या.
चोरटे दरवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना मोहात पाडून पैसे भरायला भाग पाडत होते.अशा प्रकारे त्यांनी २५ लाखांची लॉटरी मिळावी, म्हणून तब्बल २३ लाख ४१ हजार २०५ रुपये भरले. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले़ तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे अधिक तपास करीत आहेत.