शेअर मार्केटमध्ये गुंतवणकीच्या आमिषाने ५६ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 01:38 PM2018-05-17T13:38:38+5:302018-05-17T13:38:38+5:30
शेअर बाजारात पैसे गुंतविल्यास जादा परतावा मिळवून देईन, असे आमिष दाखविले़. त्याच्या या आमिषाला भुलून कंपनीतील १५ जणांनी त्यांच्याकडे पैसे गुंतविण्यास दिले़.
पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करुन जादा परतावा मिळवून देतो, असे आमिष दाखवून एकाने ओळखीच्या १६ जणांना तब्बल ५६ लाख रुपयांचा गंडा घातला असून गेल्या दोन महिन्यांपासून तो पैसे घेऊन फरार झाला आहे़. अभिषेक दिलीप गाडेकर (रा़ सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक) याच्यावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़. याप्रकरणी सरला वाघमारे (वय ५८, रा़ हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे़. हा प्रकार ८ सप्टेंबर २०१७ ते २० मार्च २०१८ दरम्यान घडला आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अभिषेक गाडेकर हे मगरपट्टा येथील एका कंपनीत कामाला आहे़. त्यांनी तेथे काम करणाऱ्यांना शेअर बाजारात पैसे गुंतविल्यास जादा परतावा मिळवून देईन, असे आमिष दाखविले़. त्याच्या या आमिषाला भुलून कंपनीतील १५ जणांनी त्यांच्याकडे पैसे गुंतविण्यास दिले़. सरला वाघमारे यांची एक नातेवाईक या कपंनीत कामाला आहे़. तिने त्यांना अभिषेक गाडेकर याच्याविषयी सांगितले़. त्यानुसार त्यांनी शेअर बाजारात पैसे गुंतविण्याची इच्छा दर्शविली़. गाडेकर याने शेअर बाजारात पैसे गुंतवित असल्याचे सांगून वेळोवेळी त्यांच्या घरी येऊन १३ लाख रुपये घेऊन गेला़. गेल्या दोन महिन्यांपासून तो न आल्याने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला़. तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़.