एटीएम कार्डची बदली करून फसवणूक करणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:17+5:302021-07-01T04:10:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ज्येष्ठ नागरिकांना हेरून त्यांना एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याचा बहाणा करून त्यांचे कार्ड बदली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ज्येष्ठ नागरिकांना हेरून त्यांना एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याचा बहाणा करून त्यांचे कार्ड बदली करून त्याद्वारे खात्यातून पैसे काढून फसवणूक करणाऱ्र्यास वानवडी पोलिसांनी अटक केली.
श्रवण सतीश मिनजगी (वय २५, रा. कदम वाकवस्ती, लोणी काळभोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्यावर आतापर्यंत पुण्यासह सोलापूर, उस्मानाबाद, पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात ११ गुन्हे दाखल आहेत.
वानवडी पोलिसांनी त्याच्याकडून ५ गुन्हे उघडकीस आणले असून साडेतीन लाख रुपये जप्त केले आहेत.
याप्रकरणी माधव धायगुडे (वय ६१, रा. हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ते ७ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वानवडीतील जगताप चौक येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने त्यांना पैसे काढण्यास मदत करतो, असे सांगून ते पासवर्ड टाईप करीत असताना तो लक्षात ठेवला. त्यानंतर हातचलाखी करून त्यांचे कार्ड बदलले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील १ लाख ३० हजार रुपये काढून फसवणूक केली होती.
वानवडी पोलिसांनी श्रवण मिनजगी याला अटक केली. श्रवण हा मूळचा दक्षिण सोलापूर येथील राहणारा आहे़.
त्याच्याविरुद्ध २०१६ पासून तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत. सोलापूर, उस्मानाबाद, बागलकोट, कर्नाटकातील अप्पर पेठ पोलीस ठाणे, पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर, देवाची आळंदी येथे हे गुन्हे दाखल आहेत. वानवडी पोलिसांनी आणखी ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्याकडून साडेतीन लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
कॅम्पमधील एका इस्ट स्ट्रीटवरील स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेलेल्या एका ६२ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला श्रवण याने मदत करण्याचा बहाणा करून त्यांचे कार्ड बदली केले. त्यांच्या खात्यातून ७० हजार रुपये काढून फसवणूक केली आहे. श्रवण याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव अधिक तपास करीत आहेत.