स्वॅब टेस्ट सेंटर्सवरच रुग्णांना मोफत सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:10 AM2021-05-24T04:10:39+5:302021-05-24T04:10:39+5:30
पुणे महापालिकेचा करार पुणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताणही वाढतो आहे. आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र काम करत ...
पुणे महापालिकेचा करार
पुणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताणही वाढतो आहे. आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. हेच लक्षात घेत पुणे महापालिका, शहरातील होम हेल्थ केअर कंपनी हिलयाॅस (HealYos) आणि संचेती रुग्णालय यांनी एक करार केला आहे. त्यानुसार स्वॅब सेंटर्सवरच फ्री मेडिकल चेकअप केले जाणार आहे आणि रुग्णांना आवश्यक तो सल्ला दिला जाणार आहे. यामुळे सर्व कोरोना रुग्णांची काळजी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदतीचा हात मिळेल.
पुणे महापालिकेमार्फत जवळपास २१ स्वॅब सेंटर्स चालवले जात आहेत. अशा पद्धतीचे कोविड-१९ केअर क्लिनिक येरवडा स्वॅब टेस्ट सेंटरमध्ये सुरू होईल आणि हळूहळू इतर सेंटर्समध्येही सुरू केलं जाईल. या करारामुळे लोकांना सहजपणे आणि तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात मदत होत असल्याने खूप आनंद वाटतो आहे, असं पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं.
हिलयाॅस आणि संचेती हॉस्पिटल स्वॅब टेस्टिंग सेंटरमध्ये कोविड-१९ केअर क्लिनिक उभारत आहेत. पुणे महापालिकेमार्फत जे स्वॅब सेंटर्स चालवले जात आहेत त्यांना बेसिक मेडिसीन किटसह फ्री मेडिकल चेकअपही दिलं जाणार आहे. जे लोक स्वॅब टेस्ट करण्यासाठी येणार आहेत. त्यांचं हिलयाॅस आणि संचेती रुग्णालयाशी संबंधित डॉक्टरमार्फत तपासणी केली जाणार आहे.
डॉक्टरांमार्फत बेसिक तपासणी झाल्यानंतर, त्यांनी घरी क्वाॅरंटाइन व्हावं की, रुग्णालयात दाखल व्हावं, याबाबत सल्ला दिला जाईल. जर रुग्णाला कोणतीही गंभीर लक्षणं नसतील आणि ते होम आयसोलेट होऊ शकत असतील तर हिलयाॅस आणि संचेती हॉस्पिटलमार्फत त्यांना मोफत बेसिक मेडिकल टूल किट दिलं जाईल.
हिलयाॅस आणि संचेती हॉस्पिटलच्या संचालिका रुपल संचेती यांनी सांगितलं, स्वॅब टेस्टवेळी बेसिक मेडिकल चेकअप होणं खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून उपचारांमध्ये उशीर होऊ नये. त्यामुळेच जेव्हा रुग्ण त्यांच्या पहिल्या स्वॅब टेस्टसाठी येतील तेव्हा त्यांना आम्हाला अशी सेवा द्यायची होती. अशा पद्धतीच्या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन आम्ही सर्वांना योग्य अशी कोविड-१९ सेवा देऊ शकू.
--------------
आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन आवश्यक
कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत, रुग्णालयातील कर्मचारी खूप मेहनत करून सेवा पुरवत आहेत. रुग्णांची संख्या इतकी वाढली आहे की प्रत्येकाची काळजी घेणं खूप कठीण झालं आहे. अशा महासाथीच्या परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यस्थापन करणं हे मुख्य आव्हान आहे. त्यामुळे आम्ही असा उपक्रम राबवण्यात पुढाकार घेतला. जे स्वॅब सेंटरवर येतील, त्यांचं आम्ही मोफत मेडिकल चेकअप करू'', असं संचेती हॉस्पिटलच्या संचालिका रुपल संचेती यांनी सांगितले.
-----------------
सध्या एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असेल, तर त्याला पुढील तपासणीसाठी नायडू हॉस्पिटल किंवा ससून हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. पण आता या उपक्रमामुळे स्वॅब सेंटरमध्येच मोफत वैद्यकीय तपासणी होऊन रुग्णांना तिथेच सल्ला दिला जाणार आहे. या महासाथीत हिलयाॅस आणि संचेती हॉस्पिटल पुढाकार घेऊन अशा प्रकारचा उपक्रम राबवत आहेत, यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत.
- रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका