‘फ्री अँड ईझी’, ‘पिंपळ’ सर्वोत्कृष्ट, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 07:36 AM2018-01-19T07:36:13+5:302018-01-19T07:36:17+5:30
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चीनच्या जून जेंग दिग्दर्शित ‘फ्री अँड इझी’ या चित्रपटाने दहा लाख रुपयांचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा बहुमान मिळवला.
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चीनच्या जून जेंग दिग्दर्शित ‘फ्री अँड इझी’ या चित्रपटाने दहा लाख रुपयांचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा बहुमान मिळवला. ‘संत तुकाराम’ सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पाच लाख रुपयांच्या पुरस्कारावर गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘पिंपळ’ या चित्रपटाने आपले नाव कोरले. ‘म्होरक्या’ आणि ‘पिंपळ’ने सर्वाधिक पुरस्कार पटकावित पिफवर मोहोर उमटवली.
गेले आठवडाभर विविध देशांच्या चित्रपटांची मेजवानी मिळालेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पुरस्काराचा समारोप सोहळा गुरुवारी कोथरूड येथील सिटी प्राईड येथे रंगला. जागतिक, मराठी आदी विविध विभागांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या पुरस्कारांची या वेळी घोषणा झाली. ‘फास्टर फेणे’, ‘मुरांबा’ अशा तगड्या व लोकप्रिय चित्रपटांवर मात करत ग्रामीण भागातील जीवनाचा बाज जपणाºया ‘म्होरक्या’ व ‘पिंपळ’ या चित्रपटांनी पिफ गाजवला.
अमर देवकर दिग्दर्शित ‘म्होरक्या’ चित्रपटासाठी गिरीश जांभळीकर यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणकार, रमण देवकर यास सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरवण्यात आले. गजेंद्र अहिरे यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला. सचिन खेडेकर यांना स्पेशल ज्युरी अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ‘नशीबवान’ या चित्रपटासाठी मिताली जगताप यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले. यावेळी एफटीआयआयच्या विद्यार्थी मलयज अवस्थी याचा विशेष सन्मान करण्यात आला.