फुकटची बिर्याणी महिला पोलीस अधिकाऱ्यांना भोवणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:10 AM2021-07-31T04:10:38+5:302021-07-31T04:10:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी एका उपाहारगृहातून पोलीस कर्मचाऱ्याला बिर्याणी आणण्याचा आदेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी एका उपाहारगृहातून पोलीस कर्मचाऱ्याला बिर्याणी आणण्याचा आदेश दिला. “हे उपहारगृह आपल्याच हद्दीतले आहे ना? मग पैसे कशाला द्यायचे,” अशी विचारणा त्यांनी केल्याचा आरोप आहे. नारनवरे आणि संबंधित कर्मचारी यांच्यातील संभाषणाची कथित ध्वनीफित समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे. फुकटच्या बिर्याणीच्या या उपद्व्यापामुळे पोलिसांची राज्यभर बदनामी झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना चौकशीचा आदेश दिला आहे.
नारनवरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला टिळक रस्त्यावरील प्रसिद्ध उपाहारगृहातून बिर्याणी आणण्यास सांगितल्याचे कथित ध्वनीफितीत म्हटले आहे. “मॅडम साजूक तुपातील बिर्याणी आणू का?,” या कर्मचाऱ्याच्या प्रश्नावर “फार स्पायसी नको... जरा तोंडाला टेस्ट पण आली पाहिजे. त्यामुळे प्रॉन्स पण आण,” असे या क्लिपमधील महिला त्याला सांगते. एवढेच नव्हे तर संबंधित महिलेच्या पतीला मटण आवडते पण त्यांना खाऊ देत नाही, असेही ही महिला कर्मचाऱ्याला सांगते. बिर्याणी, प्रॉन्स, चिकन, मटण वगैरे पदार्थ आणणार कसे यावर क्लिपमधला पुरुष ‘आपण नेहमी कॅश देऊन आणतो,’ असे सांगतो. त्यावर ती महिला ‘आपल्या हद्दीतील उपाहारगृह चालकाला पैसे कशाला द्यायचे,’ अशी विचारणा करते. यावरुनच पोलिसांची राज्यभर बदनामी चालू आहे.
पोलीस उपायुक्त नारनवरे यांनी ध्वनीफितीमध्ये तांत्रिक छेडछाड केल्याचा दावा केला आहे. ‘मॉर्फ’ केलेली ध्वनीफित खोडसाळपणे प्रसारीत केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मी येण्यापूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कर्मचारी हप्तेखोरी करत होते. त्यांचे रॅकेट होते. त्यांच्यावर कारवाई केल्याने गैरप्रकारांना आळा बसला. त्यांचा माझ्यावर रोष होता. माझी बदली व्हावी तसेच माझ्यावर कारवाई होऊन मी अडचणीत यावे, या हेतूने ध्वनीफित प्रसारित केल्याचे नारनवरे यांचे म्हणणे आहे.