पदवी प्रवेशासाठी विनाशुल्क ‘सीईटी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:53+5:302021-06-06T04:08:53+5:30
पुणे: विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जुलैअखेर सीईटी होणार असून, बारावी परीक्षा रद्द केल्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या पदवी ...
पुणे: विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जुलैअखेर सीईटी होणार असून, बारावी परीक्षा रद्द केल्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या पदवी प्रवेशासाठी प्रथमच विनाशुल्क सीईटी घेण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. ते म्हणाले की, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या सीईटीसंदर्भात नुकतीच बैठक झाली. त्यात अभियांत्रिकी, फार्मसीसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जुलैअखेर अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीईटी घेण्याचा निर्णय झाला आहे. तसेच, यंदा सीईटीसाठी परीक्षा केंद्र दुपटीने वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
उदय सामंत म्हणाले की, बारावीची परीक्षा रद्द झाल्याने बीए, बीकॉम, बीएसस्सी यांसारख्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया कशी राबवावी याबाबत शिक्षणतज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. परंतु, पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीसुद्धा सीईटी घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, सीईटीचा निर्णय घेण्यात येणार आहे. सीईटी घेण्याचा निर्णय झाल्यास ती कोणत्याही शुल्काशिवाय घेतली जाईल.
चौकट
“मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सरकारची भूमिका आहे. परंतु, याबद्दल जे गैरसमज पसरवतात, त्यांचे कोण किती ऐकतात ते माहीत नाही,” असे उदय सामंत म्हणाले. तसेच, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी कोरोनाकाळात मोर्चा न काढता मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांच्याकडे आपली मागणी मांडावी, असे सामंत म्हणाले.