चाकण बाजारात शेतमाल फुकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:14 AM2021-08-18T04:14:45+5:302021-08-18T04:14:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : सलग दोन दिवस सुट्टी आल्याने येथील भाजीपाला बाजारात मंगळवारी (दि.१७) मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांसह ...

Free commodities in Chakan market | चाकण बाजारात शेतमाल फुकट

चाकण बाजारात शेतमाल फुकट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

चाकण : सलग दोन दिवस सुट्टी आल्याने येथील भाजीपाला बाजारात मंगळवारी (दि.१७) मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांसह तरकारी मालाची मोठी आवक झाल्याने अक्षरशः माल ठेवण्यासाठी जागा कमी पडली. तर, खरेदीसाठी ग्राहकांची संख्या कमी पडल्याने बराच शेतीमाल पडून राहिला. यामुळे अनेकांनी आपला माल बाजार भाव नसल्याने तसेच विक्री न झाल्याने फुकट वाटला.

खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणच्या महात्मा फुले मार्केटमध्ये सोमवारची सुट्टी वगळता रोज तरकारी बाजार असतो. या बाजारात मोठ्या प्रमाणात शेतीमाल विक्रीसाठी उपलब्ध असल्याने पुणे, पिंपरी, चिंचवड, मुंबई आदी ठिकाणांहून खरेदीदार येतात. लाखो रुपयांच्या शेतीमालाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात. परंतु स्वातंत्र्य दिन आणि सोमवारच्या आठवडी सुटीने सलग दोन दिवस खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट बंद ठेवण्यात आले होते.

दोन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी (दि.१७ ) तरकारी बाजार भरला होता. बाजारात मोठ्या प्रमाणात कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात आदी पालेभाज्यासह वांगी, कोबी, फ्लॉवर, वाटाणा, गवार, दुधी भोपळा यांच्यासह विविध प्रकारच्या तरकारी मालाची मोठी आवक झाली. अचानक वाढलेल्या आवकमुळे मार्केट यार्डमध्ये शेतीमाल ठेवण्यासाठी जागा अपुरी पडली. एकदमच माल विक्रीसाठी आल्याने खरेदी ग्राहक कमी पडल्याने बराच शेतीमाल विक्रीअभावी पडून राहिला. तर काही माल फुकटात द्यावा लागल्याने यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

चौकट

चाकण परिसरातील वाढत्या नागरीकीकरणाने रोजच्या आहारात समावेश असलेल्या पालेभाज्यांसह तरकारी मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री चाकण बाजारात होत असते. बारामाही भामा नदीला असणारे मुबलक पाणी आणि सध्या सुरू असलेला पावसाळा यामुळे येथील शेतकरी मोठ्या संख्येने नगदी पिके घेऊ लागले आहे. बाजाराला सलग सुट्ट्या आल्याने मोठ्या प्रमाणात शेतीमालाची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

फोटो आहे :

170821\img-20210817-wa0018.jpg

चाकणच्या बाजारात शेतीमालाची मोठ्या प्रमाणात झाली आवक

Web Title: Free commodities in Chakan market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.