दुकानदाराच्या अंगठ्यावरच मिळणार मोफत धान्यवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:17 AM2021-05-05T04:17:17+5:302021-05-05T04:17:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १ मेपासून पात्र लाभार्थ्यांना मोफत स्वस्त धान्य मिळणार आहे. मात्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १ मेपासून पात्र लाभार्थ्यांना मोफत स्वस्त धान्य मिळणार आहे. मात्र त्यासाठी रेशनकार्डधारकाला ‘ई-पॉस’मशीनवर अंगठा लावणे आवश्यक राहणार आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहेे. पुणे जिल्ह्यात हा निर्णय मागे घेण्यासाठी रेशनिंग दुकानदारांनी जोरदार आंदोलन केले. ई-पॉस मशीनवर रेशनकार्ड धारकांचा अंगठा घेण्याचा निर्णय अखेर मागे घेतला आहे. यामुळे सध्या सुरू असलेल्या पद्धतीनेच दुकानदाराचा अंगठा घेऊन मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे.
राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १५ मेपर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गरीब व सर्वसामान्य नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून राज्य शासनाने मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील सुमारे २६ लाख ९० हजार लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारने मागील लॉकडाउनच्या कालावधीत केशरी शिधापत्रिकाधारकांना आठ रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि १२ रुपये दराने तांदूळ उपलब्ध करून दिला होता. ही योजना मागील नोव्हेंबरपर्यंत होती. सध्याच्या कोरोना कालावधीत केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्याची गरज आहे. अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना सध्या प्रत्येकी दोन रुपये दराने तीन किलो गहू आणि तीन रुपये दराने दोन किलो तांदूळ उपलब्ध करून दिला जातो. या योजनेतील जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिकाधारकांची संख्या सुमारे २ लाख ६९ हजार असून, लाभार्थ्यांची संख्या २६ लाख ९० हजार एवढी आहे.
--
रेशन दुकानावर सॅनिटायझर वापर बंधनकारक
जिल्ह्यात पात्र लाभार्थ्यांना मोफत धान्यवाटप सुरू आहे. हे धान्य घेण्यासाठी काही दुकांनामध्ये गर्दी होती. या वेळी काही दुकानांमध्ये सॅनिटायझरचा वापर केला जातो, तर अनेक दुकानांमध्ये या नियमाला हरताळ फासला जातो. यामुळेच दुकानदारांनी रेशनकार्डधारकांचा अंगठा घेण्यास विरोध केला.
--
दुकानदारांना विमा संरक्षण द्या; अन्यथा बेमुदत संप सुरूच राहणार
कोरोना महामारीच्या संकटकाळात रेशनिंग दुकानदार आपला जीव धोक्यात घालून रेशनकार्डधारकांना मोफत धान्यवाटप करत आहेत. त्यात शासनाने कार्डधारकांचा अंगठा घेणे बंधनकारक केले. याला राज्यातील सर्व रेशनिंग दुकानदारांनी विरोध केला. अखेर शासनाने हा निर्णय मागे घेतला. याच सोबत सर्व रेशनिंग दुकानदारांना विमा संरक्षण देण्याची मागणी देखील संघटनेच्या वतीने केली आहे. अद्याप शासनाने ही मागणी मंजूर केली नाही. यामुळेच १ मेपासून राज्यभरातील रेशनिंग दुकानदार बेमुदत संपावर गेले आहेत. विमा संरक्षणाची मागणी मंजूर होईपर्यंत बेमुदत संप सुरूच राहणार आहे.
- गणेश डांगे, अध्यक्ष रेशनिंग दुकानदार संघटना
--
जिल्ह्यात धान्यवाटप सुरू
जिल्ह्यात रेशनकार्डधारकांचा अंगठा घेण्यास विरोध करत काही दिवस रेशनिंग दुकानदारांनी धान्य वाटप बंद केले होते. परंतु, शासनाने हा निर्णय मागे घेतल्याने अखेर जिल्ह्यात मोफत धान्य वाटप सुरू झाले आहे.
- भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी