झगमगाटासाठी फुकटची वीज; पुण्यातील हजारो मंडळांकडून अनाधिकृत विजेचा वापर
By नितीन चौधरी | Published: September 7, 2022 12:01 PM2022-09-07T12:01:43+5:302022-09-07T12:06:51+5:30
वारंवार विनंती करूनही शहरातील केवळ ११६ मंडळांनी अधिकृत वीजजोड घेतला
पुणे : कोरोनामुळे गेली दोन वर्षे सार्वजनिकरित्या साजरा न झालेल्या गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध यंदा हटल्याने भक्तांचा व नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. शहरात सुमारे साडेपाच हजार नोंदणीकृत व बिगरनोंदणी असलेल्या मंडळांनी बाप्पापुढे विद्युत रोषणाईचा झगमगाट केला आहे.
वारंवार विनंती करूनही शहरातील केवळ ११६ मंडळांनी अधिकृत वीजजोड घेतला आहे. बहुतांश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर करण्यावर भर दिला आहे. गणेशाेत्सव हा धार्मिक अस्मितेचा मुद्दा असल्याने महावितरण कारवाई करण्यास धजावत नाही. त्यामुळेही या मंडळांना फावले आहे.
पुणे व पिंपरी - चिंचवड महापालिका हद्दीत हजारो सार्वजनिक गणेश मंडळ अत्यंत उत्साहाने यावर्षी गणेश उत्सव साजरा करत आहेत. सगळीकडे विद्युत रोषणाईचा झगमगाट पाहायला मिळत आहे. पुणे शहरात महापालिकेकडे नोंदणी केलेली सुमारे ३,५६६ मंडळे आहेत. बिगर नोंदणी असलेल्या मंडळांची संख्या सुमारे २ हजार असल्याचे बोलले जात आहे. या मंडळांनी गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच अधिकृत वीजजोड घ्यावी, यासाठी महावितरणने आवाहन केले होते.
गणेश मंडळे आणि वीजजाेड
- पुणे परिमंडळात पुणे महापालिका, पिंपरी - चिंचवड महापालिका आणि जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश होतो. गणेशाेत्सवासाठी घरगुती दरांपेक्षाही स्वस्त दराने वीज देण्याचे महावितरणने जाहीर केले होते. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही केली होती. एवढे असूनही अधिकृत वीज जोडणीसाठी बहुसंख्य गणेश मंडळ महावितरण कार्यालयात फिरकलेसुद्धा नाहीत.
- शहरात साडेपाच हजार मंडळांपैकी केवळ ११६ मंडळांनी अधिकृत वीजजोड घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपरी शहरात नोंदणीकृत असलेली १,७४३ मंडळे व एवढीच संख्या असलेल्या बिगर नोंदणीकृत मंडळांपैकी केवळ ३० मंडळांनीच अधिकृत वीजजोड घेतला आहे.
मंडळांकडून केराची टोपली
गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोड घेऊन उत्सव साजरा करण्याचे आवाहन महावितरणने केले होते. अनधिकृत वीज जोडामुळे विजेच्या अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. वीजसुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता घेण्यात आलेले अनधिकृत वीजजोड हे जीवघेणे ठरत आहेत. अधिकृत वीज जोड घेताना विद्युत संचाच्या मांडणीची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी केली जाते. त्यामुळे अपघात टाळता येतात. गणेशोत्सवात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणूनच मंडळांनी अधिकृत वीजजोड घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले होते. त्याला या मंडळांनी केराची टोपली दाखवली आहे.
''गणेशोत्सव धार्मिक अस्मितेचे प्रतीक आहे. अधिकृत वीजजोड घ्यायला हवा. महावितरणचे कर्मचारी अनधिकृत वीजजोड तोडण्यास गेल्यानंतर हल्ला होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव नाही. - महावितरणचे वरिष्ठ अधिकारी''