एकाच ठिकाणी सर्व उपचार मिळणार मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:10 AM2017-11-24T01:10:55+5:302017-11-24T01:11:05+5:30
बारामती : ग्रामीण भागात गर्भवती माता आणि अर्भकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी बारामती उपजिल्हा रुग्णालयात प्रयोगिक तत्त्वावर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
बारामती : ग्रामीण भागात गर्भवती माता आणि अर्भकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी बारामती उपजिल्हा रुग्णालयात प्रयोगिक तत्त्वावर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपप्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी उपजिल्हा रुग्णालयातच तालुक्यातील गर्भवती मातांची सर्व तपासणी व प्रसूती होणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीरा चिंचोलीकर यांनी दिली.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत हा उपक्रम बारामती उपजिल्हा रुगणालयात सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गर्भवती माता आणि अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘मोफत सिझेरियन’ही योजना पुणे जिल्हा परिषदेने यापूर्वी सुरू केली होती. हीच योजना राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी राज्यभर राबविण्याची मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून बारामती उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती मातांसाठी सुसज्ज प्रसूती केंद्र, सर्व प्रकारच्या तापासण्या, सोनोग्राफी, औषधोपचार तसेच नाष्टा व जेवणाची मोफत सोय केली जाणार आहे. गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटींचेदेखील नियोजन करण्यात आले आहे.
सध्या बारामती उपजिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सरासरी ५० गर्भवती मातांची तपासणी केली जात आहे. त्यांना आहार व औषोधोपचारांबाबत मार्गदर्शन तसेच आवश्यक त्या तपासण्या मोफत केल्या जात आहेत. सर्व उपचार एकाच ठिकाणी मिळणार असल्याने गर्भवती माता आणि त्यांच्या कुटुंबीयांचीदेखील धावपळ होणार नाही. तसेच, रुग्णालयापासून दूर अंतरावर राहणाºया मातांसाठी मोफत रुग्णवाहिकादेखील या उपक्रमांतर्गत उपलब्ध असेल.
या योजनेमुळे गरीब व गरजू गर्भवती मातांना आता मोफत अद्ययावत उपचार व औषोधपचार मिळणार आहेत. त्यामुळे गर्भवती माता व अर्भक मृत्यू रोखण्यात यश येईल.
>शासकीय रुग्णालयात प्रथमच ‘मोफत सिझेरियन’
ग्रामीण भागातील प्रथमिक व उपप्रथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूतीची सोय आहे; परंतु त्या ठिकाणी केवळ नैसर्गिक प्रसूतीच करता येते. मात्र, प्रसूतीदरम्यान काही समस्या निर्माण झाल्यास अशा मातांची प्रसूती ‘सिझेरियन’ पद्धतीने करावी लागते. प्रथमिक व उपप्रथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सिझेरियनची सोय नसल्याने अशा अडलेल्या मातांना खासगी रुग्णालयात भरती करावे लागते. सिझेरियनचा खर्चदेखील मोठा असल्याने गरीब कुटुंबांना तो परवडत नाही. या बाबींचा विचार करून तालुक्याच्या ठिकाणी असणाºया उपजिल्हा रुग्णालयातच सर्व प्रकारच्या सोयी गर्भवती मातांसाठी सुरू करणे या योजनेमागचा उद्देश आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व उपचार व शस्त्रक्रिया मिळणार आहेत, अशी माहिती डॉ. मीरा चिंचोलीकर यांनी दिली.
>ऊसतोडणी मजूर महिलांनादेखील मिळणार योजनेचा लाभ
बारामती तालुक्यातील लोणी भापकर, मोरगाव, मुर्टी, होळ येथील प्रथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाºया गर्भवती मातांच्या उपचारांची व प्रसूतीची सोय बारामती उपजिल्हा रुग्णालयात तर सांगवी, डोर्लेवाडी, काटेवाडी, शिर्सुफळ, पणदरे येथील गर्भवती मातांच्या उपचारांची व प्रसूतीची सोय रुई येथील महिला ग्रामीण रुग्णालयात केली आहे. या गर्भवती मातांसाठी १०८ क्रमांकाची मोफत रुग्णवाहिका सेवादेखील आरोग्य विभागाच्या वीतने देण्यात आली आहे. तसेच, बारामती तालुक्यातील सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात ज्या ऊसतोडणी महिला कामगार आहेत, त्यांनादेखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर, ० ते २ वर्षे वय असणाºया बालकांना कारखाना कार्यक्षेत्रात आरोग्य विभागाच्या वतीने अतिरिक्त आरोग्य सेवा शिबिर भरवून लसीकरणासदेखील सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप यांनी दिली.