अनाथ कन्येला उच्च शिक्षणाची विनामूल्य संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:11 AM2021-02-12T04:11:21+5:302021-02-12T04:11:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सामाजिक बांधिलकी जपत अमृता करवंदे यांना एमबीए अभ्यासक्रमासाठी मोफत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सामाजिक बांधिलकी जपत अमृता करवंदे यांना एमबीए अभ्यासक्रमासाठी मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. अनाथांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा मार्ग या कृतीतून विद्यापीठाने समाजासमोर आणला आहे.
अमृता करवंदे यांनी वयाच्या १८ वर्षांपर्यंत गोव्यातील येथील मातृछाया आश्रम या अनाथालयात राहून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आश्रमातील व्यवस्थापनाने त्यांच्या विवाहाचे प्रयत्न चालू केले. परंतु करवंदे यांना पुढे उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी आश्रम सोडून पुण्यात येण्याचा निर्णय घेतला.
पुण्यातील सेवासदन संस्थेत राहून पुढील पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा देण्यास सुरुवात केली. सन २०१८ मध्ये तहसीलदार पदाची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांच्याकडे जन्मतारीख, जातीचा व नॉन-क्रिमीलेयरचा दाखला नसल्याने एक गुणामुळे त्यांची गुणवत्ता डावलण्यात आली. मात्र त्यांनी हार न पत्करता महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
करवंदे यांनी अनाथांची व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेऊन अनाथांना शासकीय सेवेत व शिक्षणात अनाथांसाठी १ टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. अमृता करवंदे यांच्या संघर्षातून झालेला हा निर्णय अनाथांसाठी क्रांतिकारक ठरला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्राचे सहायक कुलसचिव हिरालाल माळवे आणि सहयोगी सल्लागार उत्तम जाधव यांनी करवंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.