शहरातील २०० ठिकाणांवर मिळणार मोफत इंटरनेट

By admin | Published: January 2, 2017 02:35 AM2017-01-02T02:35:45+5:302017-01-02T02:35:45+5:30

महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी प्रकल्पांर्तगत शहरातील प्रमुख २०० सार्वजनिक ठिकाणांवर वाय-फाय सुविधा कार्यान्वित करून मोफत इंटरनेट उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Free internet access is available in 200 locations in the city | शहरातील २०० ठिकाणांवर मिळणार मोफत इंटरनेट

शहरातील २०० ठिकाणांवर मिळणार मोफत इंटरनेट

Next

पुणे : महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी प्रकल्पांर्तगत शहरातील प्रमुख २०० सार्वजनिक ठिकाणांवर वाय-फाय सुविधा कार्यान्वित करून मोफत इंटरनेट उपलब्ध करून दिली जाणार आहे. या ठिकाणांवरून अर्ध्या तासामध्ये ५० एमबीपर्यंत इंटरनेट मिळू शकणार आहे. प्रमुख पर्यटनस्थळे, बसथांबे, बगीचे, हॉस्पिटल आदी सार्वजनिक ठिकाणांवर ही वाय-फाय सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या मोबाइलवर इंटरनेट सुविधा उपलब्ध असणे ही मूलभूत गरज झाली आहे. कॅशलेस व्यवस्थेचा पुरस्कार करताना मोबाइल बँकिंग व व्यवहारांना प्राधान्य दिले जात आहे, त्यासाठी इंटरनेट ही निकडीची गरज ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकांवर मोफत इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्याचबरोबर काही नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात प्रायोगिक तत्त्वावर मोफत इंटरनेट देण्याचा उपक्रम राबविला होता. आता पालिकेच्या वतीनेच वाय-फायद्वारे मोफत इंटरनेट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली आहे.
शहराला मोफत इंटरनेटसह
वाय-फायसह इमर्जन्सी बॉक्स, पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम, व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले आणि एन्व्हायर्नमेंटल सेन्सर्स आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी १४० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. या सेवांचे कंट्रोल बाणेर येथील अद्यवयात नियंत्रण कक्षातून केले जाणार आहे. सुरक्षा-आपत्कालीन स्थितीत अत्यंत कमी वेळात संपर्क साधता यावा, यासाठीची एक यंत्रणा उभारली जाणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्या संदेशांचे फलक शहरात ठिकठिकाणी बसविले जाणार आहेत.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मोफत इंटरनेटबरोबरच इतरही महत्त्वपूर्ण सुविधा दिल्या जाणार आहेत. शहराचे पर्यावरण सुस्थितीत राहावे यासाठी विविध ५० ठिकाणी इन्व्हायरन्मेंट मॉनिटरिंग सिस्टिम बसविल्या जाणार आहेत. तापमान, हवेची गुणवत्ता, ध्वनिप्रदूषण आदींचा अभ्यास या सिस्टीमद्वारे केला जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाची अचूक माहिती मिळण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर शहरात १२५ ठिकाणी महत्त्वाचे संदेश देण्याची यंत्रणा उभारली जाणार आहे.
आत्पकालीन परिस्थितीमध्ये तसेच आवश्यक त्या सूचना देण्यासाठी ही यंत्रणा उपयोगी ठरणार आहे. विशेषत: पोलिसांना याचा खूपच उपयोग होऊ शकेल. आपद्कालीन प्रतिसाद यंत्रणेद्वारे नागरिकांना कमीत कमी वेळात
मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Free internet access is available in 200 locations in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.