दिल्लीच्या धर्तीवर पुण्यातही पीएमपीची ‘चकटफू’ करा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 11:20 AM2019-06-04T11:20:33+5:302019-06-04T11:21:46+5:30
शहराची लोकसंख्या ४० लाख असून, शहरातील वाहनांची संख्या देखील तेवढीच म्हणजे तब्बल ३५ लाखांहून अधिक झाली आहे.
पुणे : शहराची लोकसंख्या चाळीच लाखांच्या पुढे गेली असून, वाहनांची संख्या लोकसंख्येच्या बरोबरच म्हणजे तब्बल ३५ लाखांच्या घरात पोहचली आहे. यामुळे पुणे शहराची हवा प्रचंड दुषित झाली आहे. यामुळेच दिल्ली सारकारच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने देखील खाजगी वाहनांची संख्या कमी करण्यासाठी व पर्यायाने शहरातील हवा प्रदुषण कमी करण्यासाठी सर्व शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व सर्व ज्येष्ठ नागरिक यांना पीएपीची बस सेवा मोफत सुरु करा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे. या संदर्भातील ठराव देखील त्यांनी नगरसचिव कार्यालयाला दिला आहे.
याबाबत दिलेल्या ठरावामध्ये सुतार यांनी म्हटले की, पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम नसल्यामुळे पुणेकरांना नाईलाजस्तव स्वत: च्या खाजगी वाहनांचा वापर कराव लागतो. यामुळे लाखो वाहने रोज रस्त्यावर येता. शहराची लोकसंख्या ४० लाख असून, शहरातील वाहनांची संख्या देखील तेवढीच म्हणजे तब्बल ३५ लाखांहून अधिक झाली आहे. यामुळेच शहरामध्ये प्रचंड वाहतुक कोंडी होत असून, राष्ट्रीय संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याशिवाय शहराच्या हवेतील प्रदुषणाचा इंडेक्स ८० च्या वर गेला आहे. यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होऊन नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होत आहेत.
यामुळेच पुणे महापालिकेने शहरातील सर्व शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, शंभर टक्के महिला आणि सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सार्वजनिक बस सेवा (पीएमपीएमएल) ची सेवा पूर्णपणे मोफत करावी. यामुळे शहरातील रस्त्यांवर दररोज येणा-या वाहनांची संख्या कमी होऊन प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी देखील दूर होण्यास मदत होईल, असा ठराव सुतार यांनी दिला आहे.