वाहतूककोंडी रोखण्यासाठी बसला स्वतंत्र लेन
By Admin | Published: April 9, 2017 04:45 AM2017-04-09T04:45:35+5:302017-04-09T04:45:35+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट बसस्थानकालगत असलेल्या बसथांब्यांसमोर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी बससाठी स्वतंत्र लेन करण्यात आली आहे.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट बसस्थानकालगत असलेल्या बसथांब्यांसमोर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी बससाठी स्वतंत्र लेन करण्यात आली आहे. तसेच याठिकाणी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली असून प्रवाशांच्या सोयीसाठी बसच्या माहितीची उद्घोषणा करण्यासही सुरुवात झाली आहे.
स्वारगेट येथील पीएमपीच्या बसथांब्याला खासगी वाहनांचा विळखा असतो. त्यामुळे बसथांब्यावर मोठी वाहतूककोंडी होऊन त्यात बस अडकतात. या बस अडकून बसू नयेत, यासाठी पीएमपी प्रशासनाने स्वतंत्र लेन केली आहे. एसटी बसने स्वारगेटला येणारे लाखो प्रवासी शहरात विविध ठिकाणी जाण्यासाठी या बसथांब्यावर बसची वाट पाहत उभे असतात. पण बसथांब्याला खासगी वाहनांचा विळखा असल्याने वाहतूककोंडी होऊन बस जागेवरच बराच वेळ असतात. तसेच बसथांब्यापासून बस लांब उभ्या राहत असल्याने बस पकडणेही कठीण जाते. यापार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने बससाठी स्वतंत्र लेन केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. माहितीसाठी उद्घोषणाही केली जात आहे, अशी माहिती पीएमपीचे महाव्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.
विद्यापीठालाही स्वतंत्र्य लेन
स्वारगेटप्रमाणेच पुणे विद्यापीठ प्रवेशद्वार, सिमला आॅफिस, डेक्कन कॉर्नर, एसएनडीटी महाविद्यालय येथील बसथांब्यांवरही मोठी गर्दी असते. याठिकाणीही पुढील काही दिवसांत बससाठी स्वतंत्र लेन केली जाणार आहे, असे वाघमारे यांनी सांगितले.