बारामतीत ‘प्लॅस्टिकमुक्त अभियान’
By admin | Published: August 11, 2016 02:56 AM2016-08-11T02:56:30+5:302016-08-11T02:56:30+5:30
‘प्लॅस्टिक मुक्त बारामती’ अभियान बारामती नगरपालिकेच्या वतीने आजपासून व्यापक स्वरूपात राबविण्यात आले आहे. ५० मायक्रॉनपेक्षा अधिक वजनाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या
बारामती : ‘प्लॅस्टिक मुक्त बारामती’ अभियान बारामती नगरपालिकेच्या वतीने आजपासून व्यापक स्वरूपात राबविण्यात आले आहे. ५० मायक्रॉनपेक्षा अधिक वजनाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज पहिल्याच दिवशी ५०० किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या.
मान्सूनच्या सुरुवातीला पडलेल्या पावसात बारामती शहरात ठिकठिकाणी गटारे तुंबली होती. पाऊस थांबल्यानंतर गटारे मोकळी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली तेव्हा, प्लॅस्टिक पिशव्यांमुळे गटारे तुंबल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नगराध्यक्ष योगेश जगताप, मुख्याधिकारी निलेश देशमुख, आरोग्य अधिकारी उका राठोड यांनी प्लॅस्टिकमुक्त बारामती अभियान राबविण्याचे नियोजन केले. आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सागर भोसले, किरण साळवे, मोहन शिंदे, संजय लोंढे, विलास देवकाते या कर्मचारी पथकाने आजपासून प्लॅस्टिक मुक्त बारामतीचे अभियान जोरदारपणे सुरू केले आहे.
यापूर्वी आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे आणि त्यांच्या पथकाने गणेश मंडईत प्लॅस्टिकमुक्त मंडई असे अभियान राबविण्यात आले होते. प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या फळ, भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी देखील प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या. पिशव्या बाळगल्यास दंडात्मक कारवाई केली जात होती. त्यामुळे ५० मायक्रॉनपेक्षा अधिक वजनाच्या पिशव्या मंडईमध्ये वापरल्या जात नाहीत. बहुतांश फळभाज्या विक्रेत्यांनी प्लॅस्टिक पिशव्याच ठेवण्याचे बंद केले आहे. याच अनुषंगाने बारामती शहरात प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. त्यामधून फक्त ५० मायक्रॉन वजनाच्या पिशव्या वगळण्यात आल्या आहेत. आज नगरपालिकेच्या पथकाने मोहीम सुरू केल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी त्याला विरोध केला. परंतु, जास्त वजनाच्या पिशव्यांमुळे होत असलेल्या प्रदूषणाची माहिती देण्यात आली. ज्या पिशव्यांवर बंदी आहे, त्या जप्त करण्यात आल्या. आज दिवसभरात ५०० किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या. यापुढे संपूर्ण बारामती शहरात व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. बंदी असताना देखील पिशव्या बाळगल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असे देखील सुचित करण्यात आले आहे.
आजपासून प्लॅस्टिक मुक्त बारामतीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. यापुढे संपूर्ण शहर प्लॅस्टिक मुक्त करण्यावर भर देण्यात येणार आहे. ५० मायक्रॉनच्या पिशव्या देखील वापरू नये, यावर व्यापारी वर्गाचे प्रबोधन केले जाईल. प्लॅस्टिकचे विघटन होत नाही. त्यामुळे जनावरांनी खाल्यास त्यांना धोका होतो. अनेक जनावरे दगावतात. प्लॅस्टिक बंदीनंतर पर्यायी व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. नाराळाच्या झावळ्यांपासून बनविलेले डिश वेगवेगळ्या समारंभात वापरणे योग्य आहे. त्या गाई, जनावरांनी खाल्यास त्यांना कोणताही धोका होत नाही. त्यामुळे यापुढे कागदी कापडी पिशव्यासह पर्यायी साधणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सर्वांच्या सहभागातूनच १०० टक्के प्लॅस्टिक मुक्त बारामती करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी निलेश देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)