मुक्त विहार करणारे चिऊ-काऊ पावसाळ्यात म्हणतात, ‘डू नाॅट डिस्टर्ब’
By प्रमोद सरवळे | Published: July 16, 2022 11:07 AM2022-07-16T11:07:43+5:302022-07-16T11:08:23+5:30
पावसाळ्यात बगळे कमी दिसतात कारण....
पुणे : हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यावर शाळांना सुटी देण्यात आली; पण मग असा इशारा वगैरे काहीही नसताना पक्षी पावसाळ्यात जातात तरी कुठे? ते आकाशातून गायब कसे झाले? त्यांचे आवाज येतात; पण ते दिसत नाहीत. चिमण्या, कावळे, पोपट, कबुतरे करतात तरी काय पाऊस पडत असताना, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. हा पक्ष्यांचा प्रजनन काळ असल्याने ते ‘डू नाॅट डिस्टर्ब‘ असे म्हणत घरट्यातच राहणे पसंत करतात.
पावसाळा हा पक्ष्यांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे जवळपास सर्वच पक्षी त्यांच्या सुरक्षित ठिकाणी किंवा घरट्यात थांबतात. पाऊस थांबला तर तेवढ्या वेळासाठी ते बाहेर पडतात. पावसामुळे त्यांच्या आसपासच त्यांना गवत, किडे, कीटक हे त्यांचे खाद्य उपलब्ध होते. पावसाचा अंदाज पक्ष्यांना आधीच येतो. त्यांच्या वर्तनावरून त्यामुळेच जुने लोक पावसाचा अंदाजही बांधत असत. तो बरेचदा अचूक यायचा.
पक्षितज्ज्ञांनी सांगितले की, मान्सूनच्या अगदी सुरुवातीला बरेचसे पक्षी अंडी घालतात. त्यासाठीचे घरटे पावसाळ्याआधीच तयार ठेवतात. ते सुरक्षित, पावसापासून बचाव होईल अशाच ठिकाणी असते. काही जातींच्या पक्ष्यांचा अपवादवगळला तर नर आणि मादी दोघेही या काळात घरट्यात असतात. अंडी व्यवस्थित उबवण्यासाठी गरम वातावरणाची गरज असते. पिलाच्या जन्मानंतरही नर आणि मादी दोघेही त्याचे पालनपोषण करतात. त्यामुळेच एरव्ही मुक्त दिसत असलेला पक्ष्यांचा संचार पावसाळ्यात कमी दिसतो.
काही गंमतीशीर गोष्टी
कमळ पक्षी - कमळ पक्ष्यात मुख्य दोन प्रजाती आढळतात. त्यामध्ये ब्राँझ विंग जकाना आणि थिसंट विंग जकाना आहेत. या पक्ष्यांचे विशेष म्हणजे त्यांचे घरटे फक्त कमळावरच असते. प्रजननानंतर ते या घरट्यातच असतात. वजनाने लहान व लांब पाय यामुळे त्याची पिले तिथे सुरक्षित राहू शकतात. गवताळ प्रदेशात यांची संख्या जास्त दिसते.
बगळे कमी दिसतात कारण -
पावसाळ्यात ब्रिडिंगचा काळ असल्याने देश आणि घाट परिसरातील बगळे कोकणात जातात. तिथेच त्यांचे प्रजनन होते. त्यामुळे इतरत्र बगळे कमी दिसत असले तरी या काळात त्यांची संख्या कोकणात एकदम वाढते.
प्रजनन काळात पक्ष्यांच्या, विशेषतः मादी पक्ष्याच्या वर्तनात बराच बदल होतो. शक्यतो ते उडण्याची म्हणजे कष्टाची कामे करत नाहीत. एकाच जागी बसून असतात. फार गरज असेल तरच उडतात.
- डॉ. सतीश पांडे (पक्षितज्ज्ञ)
पक्ष्यांचा अधिवास मुख्यत्वे गवताळ प्रदेश आणि जंगलात आढळतो. त्यामुळे गवताळ प्रदेश नष्ट न करता तो वाढवला पाहिजे. गवताळ प्रदेश टिकला तर जंगलांचे वाळवंटीकरण होणार नाही.
- अद्वैत चौधरी (पक्षितज्ज्ञ)