दररोज साडेअकरा हजार लोकांना मोफत शिवभोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:10 AM2021-04-24T04:10:20+5:302021-04-24T04:10:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १ मेपर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १ मेपर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या लाॅकडाऊनमुळे गरीब व सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी महाआघाडी सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी योजनेतून मोफत जेवण देण्यात येत आहे. जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात या योजनेतून दररोज तब्बल साडेअकरा हजार लोकांना मोफत शिवभोजन दिले जात आहे.
देशात महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. राज्यात विविध उपाययोजना राबवून देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ मेपर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांवरील थाळीची संख्या दीड पटीने वाढवली. सध्या पुणे शहरात २६ शिवभोजन केंद्रांवर दररोज ४ हजार २४० जणांना शिवभोजन दिले जाते, तर ग्रामीण क्षेत्रात ७१ केंद्रांवरून ७३०१ जणांना शिवभोजन थाळी मोफत वाटप केले जात आहे.
शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे म्हणाल्या, शहरातील सर्व शिवभोजन केंद्रांमध्ये शिवभोजन यांची संख्या दीड पटीने वाढवली आहे. आणखीन केंद्र वाढवण्याचा प्रस्ताव असून, जास्तीत जास्त गरजू लोकांना शिवभोजन मिळावे यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
शिवभोजन केंद्रांवर राज्य सरकारने मोफत शिवभोजन देण्याचे आदेश लागू केल्यानंतर केंद्रावर भोजन घेण्यासाठी नागरिकांची संख्यादेखील वाढली आहे. ज्या ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणाचे सर्वेक्षण करून नवी शिवभोजन केंद्र सुरू करण्यास संदर्भातील प्रस्ताव तयार करत असल्याची माहिती त्यांनी दिली.