मोफत 'Shivbhojan' थाळी बंद; १ October पासून मोजावे लागणार १० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 06:32 PM2021-09-28T18:32:40+5:302021-09-28T18:33:31+5:30
शेवटचे दोन दिवस मोफत मिळणार : चार वेळा दिली होती मुदतवाढ
पुणे: कोरोना महामारीच्या काळात निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले होते. राज्य शासनाने गरजूंसाठी मोफत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेतला होता. मागील काही महिन्यांपासून याचा अनेक गरजू लाभ घेत होते. मात्र. राज्य शासनाने मोफत शिवभोजन थाळी बंद करत असल्याचे परिपत्रक जाहीर केले. येत्या १ ऑक्टोबरपासून आता यासाठी १० रूपये मोजावे लागणार आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधाच्या काळात गरजूंना मोफत शिवभोजन थाळी देण्यात येत होती. मात्र, आता या थाळीसाठी नागरिकांना दहा रुपये शुल्क भरावे लागणार असल्याचे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासनाने प्रथम १४ मे २०२१, त्यानंतर १७ जून २०२१ आणि ३० जून २०२१ अशी तीन वेळा मुदतवाढ दिली होती. त्यानंतर याच महिन्यात १४ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली होती.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत मिळून ११ ठिकाणी ही थाळी उपलब्ध करून दिली होती. वाढता प्रतिसाद लक्षात घेता दोन्ही ठिकाणी ३७ केंद्रे आहेत. या माध्यमातून दररोज ६ हजार ३८ जणांना या योजनेंतर्गत भोजन देण्यात येत आहे. आणखी दोन दिवस मोफत शिवभोजन थाळी मिळणार आहे. त्यानंतर येत्या शुक्रवारपासून (दि. १ ऑक्टोबर) आता नागरिकांना दहा रुपये केंद्र चालकाला द्यावे लागणार आहे.
''केंद्रचालकांना शासनाकडून प्रत्येक थाळीमागे ४० रुपये अनुदान मिळत असून, दहा रुपये ग्राहकाकडून मिळतात. हे अनुदान पुरवठा विभागाकडून चालकाच्या थेट बँक खात्यात दर १५ दिवसांनी जमा करण्यात येतात. महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन थाळी योजना सुरू केली होती असे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.''