आळंदीतील पवित्र इंद्रायणीची प्रदूषणातून मुक्तता करा- आमदार दिलीप मोहिते-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 07:15 PM2023-07-26T19:15:45+5:302023-07-26T19:16:22+5:30
पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून इंद्रायणीला प्रदूषण मुक्त करण्याची मागणी केली आहे...
आळंदी : राज्यातील वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीची अवस्था दयनीय झाली आहे. या पार्श्वभूमीवर खेडचे आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून इंद्रायणीला प्रदूषण मुक्त करण्याची मागणी केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून इंद्रायणीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील औद्योगिक क्षेत्रातून लाखो लिटर रसायन मिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जात आहे. याकडे पर्यावरण विभाग पूर्णत: दुर्लक्ष करत आहे. मात्र नदी प्रदूषणाचा फटका इंद्रायणीलगत असलेल्या अनेक गावांना सहन करावा लागत आहे.
तीर्थक्षेत्र आळंदीची लोकसंख्या सुमारे ५० हजारांच्या घरात आहे. या ठिकाणी राज्यातून महिन्याला लाखो भाविक येत असतात. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक पट्ट्यातून इंद्रायणी नदीत मिसळणारे रसायन मिश्रित सांडपाणी आळंदीकरांच्या तसेच भाविकांच्या पदरी पडत आहे. सद्यस्थितीत आळंदीत डोळ्याची साथ पसरली आहे. तसेच काहींना कावीळ रोगाची लागण झाली आहे.
पिंपरी - चिंचवड महापालिका हद्दीतून मोठ्या प्रमाणात रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने अनेकदा पिंपरी - चिंचवड महापालिकेला नोटीस बजावली गेली आहे. परंतु, महापालिका प्रशासन त्याला जुमानत नाही. त्यामुळे याबाबत गांभीर्याने लक्ष घालून योग्य उपाययोजना करण्याची मागणी आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी अधिवेशनात केली आहे.