फुकट्यांचे तिकीट कापले! एकट्या नोव्हेंबरात ३ कोटी दंड, पुणे रेल्वे विभागातील कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 10:42 AM2023-12-07T10:42:26+5:302023-12-07T10:42:42+5:30
सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २५० प्रवाशांकडून २१ हजार २४० रुपयांचा दंड वसूल केला आहे....
पुणे :पुणेरेल्वे विभागात नोव्हेंबर महिन्यात तिकीट तपासणीदरम्यान २८ हजार ३०१ फुकटे विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून २ कोटी ५० लाख ६३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच ९ हजार ३८६ प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी ५८ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २५० प्रवाशांकडून २१ हजार २४० रुपयांचा दंड वसूल केला आहे. याद्वारे एकूण ३ कोटी ३ लाख ३५ हजार ८२४ रुपयांचा दंड वसूल केला असून, पुणे विभागातील आजवरच्या इतिहासातील हे सर्वाधिक उत्पन्न असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली. याआधी एप्रिल महिन्यात सर्वाधिक २.८० कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू राणी दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या नेतृत्वात तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू असून, प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा; अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि तो दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले.