मोफत प्रवासाचा फज्जा
By Admin | Published: December 27, 2016 03:22 AM2016-12-27T03:22:28+5:302016-12-27T03:22:28+5:30
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पुणेकरांना मोफत बसप्रवास उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव पुणे महापालिकेने प्रशासनाकडे दिला होता. पिंपरी-चिंचवड
पिंपरी : प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पुणेकरांना मोफत बसप्रवास उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव पुणे महापालिकेने प्रशासनाकडे दिला होता. पिंपरी-चिंचवड पालिकेकडूनही अशा प्रकारचा प्रस्ताव पीएमपी प्रशासनाकडे जाणे गरजेचे होते. मात्र, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे संबंधित प्रस्ताव पीएमपीकडे पाठविलाच गेला नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांंना या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम व्हावी, नागरिकांनी दुचाकींचा वापर न करता जास्तीत जास्त बसमधून प्रवास करावा, यासाठी पुणेकरांना दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीमधून मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने १ कोटी ७० लाख रुपये पीएमपीला देणार आहेत.
पिंपरी-चिंचवड परिसरातून कामानिमित्त पीएमपी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या पटीत आहे. त्यातच पीएमपीचे तिकीट दरही परवडण्यासारखे राहिले नाहीत.
तसेच शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यावरण अहवालावरून शहरातील वाढते प्रदूषण वाढत असल्याचे समोर आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘एक दिवस मोफत प्रवास’सारखी योजना सुरू केली होती. (प्रतिनिधी)
पीएमपी : पुण्यातही योजनेचा बोजवारा
‘एक दिवस मोफत प्रवास’ योजनेची घोषणा पुणे महापालिकेने केली. आजपासून ही योजना सुरू होईल, अशी अपेक्षा पुणेकरांना होती. प्रवाशांनी प्रत्यक्षात प्रवासाला सुरुवात केली, तेव्हा मात्र त्यांना वेगळाच अनुभव आला. बसने प्रवास क रणाऱ्या सर्व प्रवाशांकडून तिकीट घेतले जात होते. यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. वाहकाकडे विचारणा केली असता, ही योजनाच सुरू झाली नसल्याचे सांगण्यात आले. योजनेच्या या गोंधळामुळे मात्र प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
पालिका प्रशासनाने घोषणा केली. मात्र, ही योजना प्रत्यक्षात सुरू कधी होणार, याचे नियोजन केले नाही. त्यामुळे बसने रोज प्रवास करणाऱ्या आमच्यासारख्या अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.- निकिता शेंडगे,
पीएमपी प्रवासी