सरकारी रुग्णालयांत आता मोफत उपचार; स्वातंत्र्यदिनी खूशखबर, गरिबांना लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 08:32 AM2023-08-15T08:32:08+5:302023-08-15T08:32:52+5:30
या याेजनेला ससून रुग्णालय, पुणे महापालिकेचे दवाखाने किंवा रुग्णालय अपवाद आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क, पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्वच शासकीय रुग्णालयात मंगळवार (दि. १५) पासून सर्वच रुग्णांना सर्वच प्रकारचे उपचार माेफत मिळणार आहेत. पुण्यातील ५४२ उपकेंद्र, १०१ प्राथमिक आराेग्य केंद्र, २० ग्रामीण रुग्णालये, ४ उपजिल्हा रुग्णालय, १ जिल्हा रुग्णालयात हा लाभ मिळणार आहे. या याेजनेला ससून रुग्णालय, पुणे महापालिकेचे दवाखाने किंवा रुग्णालय अपवाद आहेत.
...ही रुग्णालये अपवाद
हे उपचार आराेग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र, प्राथमिक आराेग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यांनाच लागू आहे. हे माेफत उपचार वैद्यकीय शिक्षण आणि संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये येथे लागू नाहीत.
काेणते उपचार?
- सरकारी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची नि:शुल्क नोंदणी, माेफत चाचण्या (उदा. इसीजी, एक्स-रे, सिटी स्कॅन, प्रयोगशाळा चाचण्या इत्यादी), माेफत बाह्यरुग्ण व आंतररुग्ण उपचार, सर्व शस्त्रक्रिया, प्रसूती आणि औषधेही माेफत मिळणार आहेत.
- आंतररुग्ण विभागामध्ये दाखल रुग्णास डिस्चार्ज करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आराेग्य आयुक्तांनी दिला आहे.
आराेग्य विभागाच्या अंतर्गत असलेले सर्वच दवाखाने, रुग्णालयांत सर्वच प्रकारे माेफत उपचार आजपासून देण्यात येणार आहेत. याबाबत सर्व शासकीय दवाखाने, रुग्णालये यांना सूचना देण्यात आल्या आहेत. - डाॅ. राधाकिशन पवार, आराेग्य उपसंचालक, पुणे.