...त्या व्यक्तीस मोफत गुवाहाटी ट्रिप अन् कामाख्या देवीचे दर्शन; पुण्यात राष्ट्रवादीची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 17:18 IST2022-12-07T17:18:18+5:302022-12-07T17:18:37+5:30
पुणे शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने फ्लेक्स लावत जाहीर आवाहन केलं आहे

...त्या व्यक्तीस मोफत गुवाहाटी ट्रिप अन् कामाख्या देवीचे दर्शन; पुण्यात राष्ट्रवादीची ऑफर
पुणे : पुणे शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने फ्लेक्स लावत जाहीर आवाहन केलं आहे. ''जी कोणी पहिली व्यक्ती भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींना योग्य त्या पद्धतीने धडा शिकवेल त्या पहिल्या व्यक्तीस मोफत गुवाहाटी ट्रिप व कामाख्या देवी दर्शन'', अशा प्रकारचा मजूकर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. पुण्यात अनेकदा राजकीय घडामोडींवर बॅनरबाजी दिसून येत आहे. आताही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरवरील मजकूर हा पुणेकरांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.
औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रदान कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. तेव्हापासून राज्यभरात त्यांच्याविरोधात संतापाचे वातावरण आहे. राज्यभरात राजकीय नेते, शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्याकडून राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता याच मुद्यावरून शहरातील काही भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून असे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.
फ्लेक्सवरील मजकूर
- जी कोणी पहिली व्यक्ती भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींना योग्य त्या पद्धतीने धडा शिकवेल त्या पहिल्या व्यक्तीस मोफत गुवाहाटी ट्रिप व कामाख्या देवी दर्शन
टीप - सदरची घोषणा कुठल्याही पद्धतीने बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देण्याकरता नसून केवळ छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याकरता आहे.- राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहर