'मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते', पुण्यात ११ महिन्यात २३६ बेवारस मृतदेह आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 12:02 PM2024-12-10T12:02:26+5:302024-12-10T12:03:01+5:30
पुण्यात रस्त्यावर, नदीच्या घाटावर, वर्दळीच्या ठिकाणी हे मृतदेह आढळतात, त्यामुळे सामाजिक व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे दिसून येत आहे
पुणे: ‘‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’’ ही सुरेश भट यांची गझल आजच्या समाजात जगताना होणाऱ्या यातनांवर भाष्य करते. मात्र, पुणे शहरात अनेकांना मरणानेही छळले आहे. शहरात बेवारस आणि अनोळखी मृतदेह आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. माणसांनी गजबजलेल्या महानगरात किड्यामुंग्यांसारखी रस्त्यावर, नदीच्या घाटावर, वर्दळीच्या ठिकाणी हे मृतदेह आढळतात. त्यामुळे सामाजिक व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे दिसून येते.
सुखी संसाराची अपेक्षा असतानाच किरकोळ कारणांवरून बिनसते आणि अनेक जण घर सोडून शहरात वास्तव्यास येतात. यातील अनेक जण भीक मागून जगण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनेकांची मानसिकता खालावून त्यांना भीक मागणेही शक्य होत नाही. ऊन, वारा, पावसात ते जागा मिळेल तेथे थांबतात. फाटक्या, मळलेल्या कपड्यांमध्ये रस्त्याच्या कडेला पडून राहतात. त्यांच्याकडे कोणाचे लक्षही जात नाही. यात अनेकांना विविध आजारांची लागण होते. त्यातच अन्नपाणी व उपचाराविना त्यांचा मृत्यू होतो.
११ महिन्यात २३६ मृतदेह
पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत २०२४ या वर्षात जानेवारी ते नाेव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत २३६ बेवारस मृतदेह आढळले आहेत. २०२३ च्या तुलनेत यावर्षी बेवारस मृतदेह आढळण्याचे प्रमाण वाढले आहे.
मृतदेहांनाही पाच दिवसांचे ‘वेटिंग’
बेवारस मृतदेह शवागारात ठेवण्यात येतो. पाच दिवस मृताच्या नातेवाइकांचा शोध घेऊन प्रतीक्षा केली जाते. नातेवाईक मिळून न आल्यास पोलिसांकडून कायदेशीर बाबींची पूर्तता करून बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठीचा खर्च संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिसांना करावा लागतो. खर्च सादर केल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून खर्चाची रक्कम मंजूर केली जाते.
पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत आढळलेले बेवारस-अनोळखी मृतदेह
जानेवारी - ३४
फेब्रुवारी - २२
मार्च - ०१
एप्रिल - ०३
मे - ३४
जून - ३३
जुलै - ४२
ऑगस्ट - ५४
सप्टेंबर - ३५
ऑक्टोबर - ४०
नोव्हेंबर - ३८