महामेट्रोबरोबर कराराची मोकळीक सर्वांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:09 AM2021-07-15T04:09:50+5:302021-07-15T04:09:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महामेट्रोबरोबर करार करून आम्ही गुन्हा केलेला नाही. कोणीही हा करार करू शकते. व्यवसायाबरोबर वाहतूक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महामेट्रोबरोबर करार करून आम्ही गुन्हा केलेला नाही. कोणीही हा करार करू शकते. व्यवसायाबरोबर वाहतूक सुरळीत राहणेही महत्त्वाचे असल्याचे मत आप रिक्षा संघटनेने व्यक्त केले.
मेट्रोच्या स्थानकापासून १ किलोमीटर परीघातील प्रवासी वाहतुकीसाठी महामेट्रो कंपनीने आप रिक्षा संघटनेबरोबर नुकताच करार केला. रिक्षा पंचायत संघटनेने या करारावर टीका केली. महामेट्रोला अशा कराराचा कोणताही अधिकार नसल्याचा दावा केला आहे. या विषयावर न्यायालयात दाद मागण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.
आप रिक्षा संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य याबाबत ‘लोकमत’ला सांगितले, “या करारामुळे आपच्या रिक्षा चालकांना महामेट्रो पैसे देणार नाहीत. ते प्रवासीच देणार आहेत. स्थानकातील व तिथून बाहेर पडणाऱ्या वाहनांची गर्दी रस्त्यावर होऊ नये, वाहतुकीवर ताण येऊ नये या उद्देशाने हा करार झाला. रिक्षात बसून मेट्रोचे तिकीट काढता येईल व मेट्रोत असतानाच रिक्षा आरक्षित करता येईल. हा फायदा प्रवाशांना आहे.”
महामेट्रोने सर्वच रिक्षा संघटनांना कराराबाबत विचारणा केली असल्याचा दावा आचार्य यांनी केला. आम्हाला त्यात व्यवसायाची संधी दिसली, त्यामुळे आम्ही तो केला. अन्य स्थानकांच्या संदर्भात अन्य संघटनांनी असा करार केला तर आमची त्याला हरकत नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.