स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या प्रेमाताई पूरव यांचे निधन
By श्रीकिशन काळे | Published: July 2, 2024 04:08 PM2024-07-02T16:08:08+5:302024-07-02T16:08:22+5:30
गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग
पुणे : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या आणि अन्नपूर्णा महिला मंडळाच्या संस्थापक पद्मश्री प्रेमाताई पूरव (वय८८) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना २००२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी प्रचंड संघर्ष केला. संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाल्यावर त्यांनी ‘मराठा’ या वृत्तपत्रामध्ये काही काळ काम केले हाेते. संयुक्त महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थाने कष्टकरी लढला त्या गिरणी कामगारांसाठी त्यांनी काम केले. गिरणी कामगार युनियन आणि भारतीय महिला फेडरेशच्या कामात त्यांचे भरीव योगदान होते. दोन्ही संघटनांच्या माध्यमातून महागाई प्रतिकार संयुक्त महिला समितीच्या उभारणीत आणि संघर्षात त्यांची मोलाचे कार्य केले आहे.
गिरणी कामगारांसाठी काम करत असताना त्यांच्यासाठी खानावळ चालवणाऱ्या महिलांनी तुमचे लक्ष वेधून घेतले होते. कष्टकरी वर्गातून येणाऱ्या या महिलांसाठी पती कॉ. दादा पूरव यांच्या सहयोगाने अन्नपूर्णा महिला मंडळाची स्थापना केली होती. कम्युनिटी स्वयंपाकघर या संकल्पनेतून गरीब व परित्यक्ता महिलांचे पुनर्वसन मोठ्या प्रमाणावर होऊ शकले. याविषयीचा अनुभव त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडला. त्यांचा वारसा पुढे त्यांच्या कन्या मेधा पूरव या चालवत आहेत. सहा भगिनी संस्थांनच्या मार्फत गरीब महिलांच्या सक्षमीकरणासाठी लघुवित्त, लघुविमा, आरोग्यविमा, कुटुंबविमा, जीवनविमा, शैक्षणिक शिष्यवृत्ती, लहान मुलांसाठी पाळणाघरे व म्हातारपणासाठी आधारपूर्ण योजना अशा विविध सेवांचं जाळं त्यांनी राज्यभर उभारलं आहे. पुण्यातील हजारो महिलांना त्यांनी आधार दिला.