Pune: खडकी रेल्वे स्टेशनजवळ मालगाडी घसरली, वाहतूक दीड तास ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 07:13 PM2023-11-25T19:13:45+5:302023-11-25T19:14:13+5:30
लोकल आणि काही एक्स्प्रेस गाड्यांना उशीर...
पिंपरी : पुण्यावरून लोणावळ्याच्या दिशेने जाणारी मालगाडी शनिवारी (दि. २५) दुपारी तीनच्या सुमारास खडकीरेल्वे स्टेशनजवळ रुळावरुन खाली घसरल्यामुळे लोणावळ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. यामुळे लोकल आणि काही एक्स्प्रेस गाड्यांना उशीर झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
पुणे-लोणावळा मार्गावरुन दररोज १५० हून अधिक रेल्वे ये-जा करतात. यात एक्स्प्रेस गाड्यांबरोबर लोकलच्या ४० फेऱ्यांचा समावेश आहे. शनिवारी दुपारी तीन वाजून २२ मिनटांनी पुणे स्टेशनवरुन लोणावळ्याकडे जाणारी मालगाडी खडकी रेल्वे स्थानकावर लूप लाईनवर रुळावरुन खाली उतरली होती. यामुळे पुणे-लोणावळा लोकल सेवा ठप्प झाली होती. तसेच दौंड-इंदोर एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेससह इतर एक्स्प्रेस इतर रेल्वे स्थानकांवर उभ्या होत्या.
पुणे स्थानकातून दुपारी एक नंतर सुटणारी ३ वाजताची पहिलीच लोकल असल्यामुळे या लोकला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. पण, शनिवारी ३, ३.४० आणि ४.२५ या लोकल सुटल्या नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. पुणे, शिवाजीनगर आणि खडकी रेल्वे स्थानकांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रेल्वे मार्ग मोकळा झाल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरु झाली. पण, त्यानंतरही बऱ्याच रेल्वे उशीराने धावत होत्या.