मालवाहतूक देखील होणार सुपरफास्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:11 AM2021-05-09T04:11:56+5:302021-05-09T04:11:56+5:30
पुणे : आयुर्मान संपलेल्या प्रवासी रेल्वे डब्यातून मालाची (वाहनाची) अतिजलद म्हणजे ताशी ११० किमी वेगाने वाहतूक होणार आहे. ...
पुणे : आयुर्मान संपलेल्या प्रवासी रेल्वे डब्यातून मालाची (वाहनाची) अतिजलद म्हणजे ताशी ११० किमी वेगाने वाहतूक होणार आहे. नुकतेच अंबाला रेल्वे विभागात याच्या वेगाची चाचणी झाली. या वेळी गाडी ताशी १२० किमी वेगाने धावली. मुख्य संरक्षक आयुक्तांनी मात्र ताशी ११० किमी वेगाने गाडी धावण्यास मंजुरी दिली. लवकरच रेल्वे बोर्डकडून देखील ह्याला मंजुरी मिळेल. मग भारतात मालवाहतूक देखील सुपरफास्ट गतीने होईल.
रेल्वे मंत्रालयाने आयुर्मान संपलेले प्रवासी डबे भंगारात न घालता त्याचा वापर दुचाकी व चारचाकी वाहनाची वाहतूक करण्यासाठी उपयोगात आणण्याचे ठरविले. त्यानुसार एनएमजी ( न्यू मोडीफाय गुड्स ) डबे तयार करण्यात आले. आता यात आणखी बदल झाला असून एनएमजीएच डबे तयार करण्यात आले. आता देशात जवळपास २ हजार डबे तयार करण्यात आले.
याद्वारे वाहनाची वाहतूक रस्ते वाहतुकीच्या तुलनेत स्वस्त, जलद व सुरक्षित होत आहे. शिवाय यामुळे इंधनाची देखील बचत होत आहे.
--------------
कसे असतात एनएमजी कोच :
प्रवासी डब्यातील सीट काढून ती जागा मोकळी केली. त्यात दुचाकी व चारचाकी बसेल अशी जागा तयार केली. तसेच खिडक्या व दरवाजे बंद करण्यात आले. रेल्वे स्थानकावरदेखील विशिष्ट प्रकारचे रॅम्प तयार करण्यात आला. एका डब्यातून १५ टन मालाची वाहतूक होते. पूर्वी त्याची क्षमता ९.२ टन इतकी होते. तसेच डब्यात लाईटची व्यवस्था करण्यात आली. दरवाजाच्या रचनेत बदल झाला आहे.
परळचा पॅटर्न देशभर चालणार :
रेल्वेच्या परळ कार्यशाळेत मुख्य कार्यशाळा व्यवस्थापक विवेक आचार्य यांनी यावर आणखी काम केले असून, हे डबे ११० किमी वेगाने धावण्यासाठी तयार केले आहेत. यावर्षी १०० डबे तयार केले जातील. परळमध्ये तयार केलेल्या डब्याप्रमाणेच आता भोपाल, लखनऊ, अजमेर येथील कार्यशाळेत लवकरच अशा प्रकारचे डबे तयार केले जातील.
चारचाकी व दुचाकीची वाहतूक करण्यासाठी सुरुवातीला एनएमजी डबे तयार केले गेले. आता हे डबे वेगवान बनविण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे देशांतर्गत वाहनाची वाहतूक वेगाने होईल. लवकरच ११० किमी वेगाने ह्या गाडया धावतील.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई