पुणे मेट्रोच्या विद्युतीकरणाचे काम फ्रेंच कंपनीला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 12:48 AM2019-04-05T00:48:48+5:302019-04-05T00:49:08+5:30
चार टप्प्यांत होणार काम : २८ किलोमीटरचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करणार
पुणे : मेट्रो मार्गाच्या वाहतूक फेऱ्यांचे नियोजन करण्यापाठोपाठ या मार्गाचे विद्युतीकरण करण्याचे कामही फ्रान्सच्या अलस्टोम कंपनीला देण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. तब्बल १५ दशलक्ष युरोचे (सुमारे ११६ कोटी ३९ लाख रुपये) हे काम चार टप्प्यांत केले जाणार असून, २०२३ पर्यंत २८ किलोमीटर अंतराचे काम करण्याचे आव्हान कंपनीसमोर असेल.
पुणे मेट्रो लाइन १ व २ साठी ट्रॅक्शन इलेक्ट्रिफिकेशन आणि सेक्शनिंग पोस्टचे काम करण्याची जबाबदारी या कंपनीवर असेल. या मार्गावर २५ केव्हीच्या लवचिक आणि बळकट ओव्हरहेड कॅटेनरी यंत्रणा (ओसीएस/ओएचई) उभारणे, त्याची तपासणी करून यंत्रणा कार्यान्वित करून द्यावी लागेल. त्याचबरोबर पुणे मेट्रो रेल प्रोजेक्टसाठी सेक्शनिंग पोस्टही बसवावे लागतील. या प्रकल्पाची अंमलबजावणी चार टप्प्यांत केली जाणार असून, २८ किलोमीटरच्या मार्गाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करावे लागेल, अशी अट करारात आहे.
अलस्टॉमला यापूर्वी, मुंबई मेट्रोचे २ ए, २ बी व ७ क्रमांकाचे मार्ग आणि पुणे मेट्रोचे १ व २ क्रमांकाचे मार्गांवर एकात्मिक वाहतूक योजना राबविण्याचे कंत्राट मिळाले आहे. त्यासाठी अर्बालिस ४०० हे अलस्टॉमचे अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
सीबीटीसीएस प्रणाली
कम्युनिकेशन बेस ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम (सीबीटीसीएस) संपूर्ण स्वयंचलित प्रणाली आहे. दोन मेट्रो दरम्यानचा वेळ हा ७० सेकंद इतका असेल. या कालावधीत मेट्रो वाहतुकीचे संचलन करण्याचे किचकट काम ही प्रणाली पार पाडेल. तसेच, वीजवापरातही त्यामुळे ३० टक्के बचत होणार असल्याचा दावा अलस्टोम कंपनीने केला आहे.
कॅटेनरी सिस्टीममुळे देखभाल खर्चात कपात
विद्युतीकरणासाठी २५ केव्ही फ्लेक्सिबल अॅण्ड रिजिड ओव्हरहेड कॅटनरी सिस्टीममुळे उभारणी आणि देखभाल दुरुस्तीच्या खर्चात कपात होणार आहे.