पुन्हा नवी सुरुवात! पुण्यातील अप्पा बळवंत चौकात शालेय साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थी अन् पालकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 05:19 PM2021-06-23T17:19:44+5:302021-06-23T17:23:10+5:30
जून महिना सुरू झाला की दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांची पालकांसह पुण्यातील अप्पा बळवंत चौकात एकच झुंबड उडालेली असते.
पुणे:जून महिना सुरू झाला की दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांची पालकांसह पुण्यातील अप्पा बळवंत चौकात एकच झुंबड उडालेली असते. मात्र, मागच्या वर्षी कोरोना संकटाने जसे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाले त्याला शिक्षण क्षेत्र देखील अपवाद ठरले नाही. यंदाही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह शाळा कधी सुरु होणार याबाबत निश्चित सांगता येणे कठीण आहे. मात्र, तरीदेखील ऑनलाईनशाळेची तयारी सुरु झाली आहे. शालेय साहित्याच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पुणे शहरातील अप्पा बळवंत चौकात विद्यार्थी आणि पालक यांंची गर्दी दिसू लागली आहे.
पुणे शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठी घट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील कोरोना निर्बंधात शिथिलता आणण्यात आली असून नागरिकांना दिलासा दिला आहे. याचमुळे मागील काही दोन तीन दिवसांपासून अप्पा बळवंत चौकात शालेय साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. दरवर्षी येथे नवीन वर्षाची पुस्तके, वह्या आणि इतर शालेय साहित्याची खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी होत असते. यंदाही विद्यार्थी आणि पालकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, यावेळी कोरोना नियमांचे पालन होणे गरजेचे आहे, कारण अजूनही पूर्णपणे कोरोना संकट निवळलेले नाही.
कोरोना संकटामुळे मागच्या वर्षी शाळेची दारं बंद झाली. चार भिंतीच्या आत ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे शाळेतील मित्र मैत्रिणी आणि इतर आनंदाला विद्यार्थी मुकले आहे. चार भिंतीच्या आतल्या शिक्षणाकंटाळले आहेत. कधी एकदा शाळा सुरु होते याचे त्यांना वेध लागले आहेत. मात्र, सध्या तरी शाळा सुरु होण्याची शक्यता नसताना ऑनलाईन शिक्षण हाच एक पर्याय त्यांच्यासमोर आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांनी आपली शालेय तयारी सुरु केली आहे.
मागील वर्षी जून महिन्यात पूर्णपणे कडक लॉकडाऊन असल्यामुळे सर्वकाही बंद होते. त्यात शालेय साहित्याची दुकानांचा समावेश होता. यामुळे मोठ्या नुकसानाला या व्यावसायिकांना सामोरे जावे लागले. यंदा दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळाली असल्याने या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणि शालेय साहित्याच्या खरेदीसाठी होऊ लागलेली गर्दी नक्कीच सुखावणारी आहे. मात्र, यादरम्यान कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.