दोस्त दोस्त ना रहा; आलिशान गाडी घेण्यासाठी मित्रानेच केली मित्राची हत्या; आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 01:38 AM2020-01-13T01:38:58+5:302020-01-13T01:39:09+5:30
कॉल रेकॉर्डिंगमुळे पोलिसांकडून आरोपी चार तासांत जेरबंद
पिंपरी : चाळीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी मित्रानेच युवकाचे अपहरण करून त्याचा खून केल्याची घटना रविवारी पहाटे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे उघडकीस आली. पोलिसांनी मोबाइल फोनवरील ‘कॉल रेकॉर्डिंग’वरून अवघ्या चार तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.
अब्दुलआहाद सय्याब सिद्दीकी (१७) याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याचा मित्र उमर नासिर शेख (१९) यास अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुलआहाद आणि आरोपी उमर हे दोघे मित्र होते. उमर याने शनिवारी रात्री अब्दुलआहाद यास पार्टीच्या बहाण्याने स्पायसर कॉलेज येथील उद्यानात नेले. तेथे अब्दुलआहाद फोनवर बोलत असताना उमरने त्याच्या डोक्यावर वार करत दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर उमरने मोबाइलवरून अब्दुलआहादच्या कुटुंबाशी संपर्क साधला. ‘अब्दुलआहाद मेरे कब्जे में है, ४० लाख रुपये दो, और उसको लेके जाओ,’ अशी धमकी त्याने दिली. अब्दुलआहादचा मोठा भाऊ रिजवान यांनी पुन्हा फोन केला असता, ४० लाख रुपये देनेके बाद तुम्हारे भाई को सलामत घर पे छोडता हूँ, कल फोन करता हूँ, असे म्हणून उमरने फोन बंद केला. त्यानंतर बराच वेळ त्याने फोन बंदच ठेवल्याने अब्दुलआहादच्या कुटुंबीयांचा संशय बळावला. अखेर सिद्दीकी कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपासाअंती उमर याने खून केल्याची कबुली दिली आहे.
आलिशान गाडी घेण्यासाठी...
आलिशान गाडी घेण्यासाठी पैशांची गरज होती. त्यातच एक चित्रपट पाहिला. त्यातील अपहरणाच्या बनावाचे कथानक पाहून अब्दुलआहादच्या घरच्यांकडून खंडणी मागण्याचे ठरविले, त्यातून त्याचा खून केल्याचे उमर याने सांगितले.