इंदापूरात तेवीस वर्षीय युवकाचा खून करून पुरावा नष्ट करणारे मित्र अखेर जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 06:27 PM2021-06-16T18:27:45+5:302021-06-16T18:43:30+5:30
इंदापूर तालुक्यातील भीमा नदीजवळ १७ जानेवारीला हि घटना घडली असून त्यामधील दोन आरोपी या प्रकरणानंतर फरार होते
बाभुळगाव: इंदापूर तालुक्यात गणेशवाडी येथील भिमानदीपात्रात २३ वर्षीय युवकाचा अनैतीक संबंधाच्या संशयावरून त्याच्याच मित्रांनी खून केला. त्यानंतर धारदार शस्त्राने दोन्ही हात, पाय व धडावेगळे शिर करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. १७ जानेवारीला हि घटना घडली असून त्यामधील दोन आरोपी या प्रकरणानंतर फरार होते. मात्र अखेर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अकलूज येथे सापळा रचून जेरबंद केल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
याबाबत युवकाची आई मंजुषा महादेव गोरवे (वय ५१ वर्षे रा.टाकळी) यांनी इंदापूर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. तर अजय उर्फ प्रदिप प्रकाश खरात वय २० वर्षे, व प्रमोद प्रताप खरात वय २१ वर्षे दोघे रा.माळशिरस यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून पुढील तपासासाठी इंदापूर पोलीसांच्या ताब्यात दिले. इंदापूर पोलीसांनी सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना १८ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.